दुहाई डेपोवर स्थिर चाचणी, ‘एनसीआरटीसी’कडून व्हिडीओ जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गाझियाबादमध्ये रॅपिड (जलद) रेल्वे ट्रायलची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी दुहाई डेपोत तयार करण्यात आलेल्या 500 मीटर लांबीच्या ट्रकवर रविवारी रॅपिड रेल्वे धावताना दिसली. रॅपिड रेल्वे विजेवर चालवून त्याची चाचणी घेतली जात आहे. सर्वप्रथम गाझियाबादमध्ये देशातील पहिली जलद रेल्वे धावणार आहे. मार्च 2023 मध्ये देशात जलद रेल्वे धावण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर दिल्ली ते मेरठचा प्रवास अवघ्या 50 मिनिटांत पूर्ण करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. ‘एनसीआरटीसी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर 51-सेकंदाचा व्हिडीओ अपलोड केला असून त्यात दुहाई डेपोच्या 700 मीटरच्या ट्रकवर जलद रेल्वे धावताना दिसत आहे. याप्रसंगी नॅशनल कॅपिटल ट्रान्सपोर्ट रीजन कॉर्पोरेशनचे एमडी विनय कुमार सिंग उपस्थित होते.
सध्या पहिली जलद रेल्वे दुहाई डेपोमध्ये आली असून, रुळावरून उतरवून त्याची चाचणी घेतली जात आहे. चाचणीचे काम पूर्ण होताच आणि कॉरिडॉर तयार होताच, रॅपिड रेल्वेची चाचणी कॉरिडॉरवर केली जाईल. सध्या दुहाई डेपोमध्ये देशातील पहिल्या जलद रेल्वेचे कार्य सुरू करण्यात आले आहे. एनसीआरटीसी अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, ही प्री-ट्रायल मेडेन-रन आहे. रॅपिड रेल्वेची मुख्य चाचणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रॅपिड रेल्वेची चाचणी होण्याची शक्मयता आहे.
दिल्ली ते मेरठ या 82 किमी रेल्वेमार्गावार जलद रेल्वेचे काम सुरू आहे. मेरठमध्ये परतापूर ते बेगमपुलपर्यंत जलद रेल्वेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर बोगदा बांधण्याचे कामही रात्रंदिवस सुरू आहे. मेरठमधील ब्रह्मपुरी स्टेशनच्या पलीकडे एक भूमिगत ट्रक तयार केला जात आहे. मेरठमध्ये जलद रेल्वेच्या ट्रकवर मेट्रोही चालवली जाणार आहे. वीजतारा आणि उपकरणे बसवल्यानंतर हा मार्ग सप्टेंबरपर्यंत चाचणीसाठी सज्ज होईल. दुहई डेपो स्टेशनचा सर्वाधिक लाभ आजूबाजूच्या 18 गावांतील लोकांना मिळणार आहे.
प्रमुख चार स्थानकांचे 75 टक्के काम पूर्ण
रॅपिड रेल्वेच्या प्राधान्य विभागातील प्रमुख चार स्थानके आता दृश्यमान आहेत. स्थानकांचे सुमारे 75 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. गुलधर, साहिबाबाद नंतर सप्टेंबरच्या अखेरीस होणारी ट्रायल रन पाहता मेरठ रोड तिराहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म बनविण्याचे काम सुरू झाले आहे. साहिबाबाद आणि गुलधर स्थानकाचे 95 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या प्लॅटफॉर्म शेड आणि फिनिशिंगचे काम सुरू झाले आहे.