राज्यसभा निवडणुकीची उमेदवारीही मिळणार
विशेष प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना त्यांच्या अध्यक्षपदासाठी पुढील दोन वर्षांकरिता मुदतवाढ मिळणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा आणि विविध राज्यांमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व प्रदेशाध्यक्षांना मुदतवाढ दिली जाणार आहे. तानावडे यांना येत्या जुलैमध्ये होणार असलेल्या राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार आहे.
भाजपने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सध्या ज्या प्रदेशाध्यक्षांची मुदत वर्षभरात संपुष्टात येत आहे त्या सर्व अध्यक्षांना पुढील दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी लोकसभा निवडणुका मार्च 2024 पासून सुरु होतील. तीन महिने चालणाऱया या निवडणूक प्रक्रियेनंतर 6 महिन्यांनी नूतन प्रदेश कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. तोपर्यंत सर्व प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीला मुदतवाढ मिळेल. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्षांना या समितीमध्ये आणखी काही पदाधिकाऱयांचा समावेश करावयाचा असेल तर ते त्यात समावेश करु शकतात.
प्रदेश राज्य कार्यकारिणीची मुदत तीन वर्षांसाठी असते. प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणीसाठीची निवडणूक भाजप दर तीन वर्षानंतर घेत असतो. एकदा निवडून आलेल्याला पुन्हा दुसऱयांदा प्रदेशाध्यक्ष बनविले जात नाही, मात्र श्रीपाद नाईक यांच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर हे अध्यक्ष बनले. त्यांची मुदत संपली आणि विधानसभा निवडणूक आल्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर विनय तेंडुलकर यांना देखील अडीज वर्षांची मुदतवाढ दिली होती. आता सदानंद शेट तानावडे यांना पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे.
राज्यसभेची बक्षिसी!
तानावडे यांनी पडत्या काळात पक्षासाठी अथक परिश्रम घेऊन पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यात मोलाची कामगिरी बजावली तसेच स्वतः संधी असून देखील विधानसभा निवडणुकीत उतरले नाही. यामुळे पक्षश्रेष्ठींनी येत्या जुलैमध्ये होणाऱया राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. विद्यमान राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत असून त्यांच्या जागी आता भाजपने सदानंद तानावडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. अद्याप निवडणुकीला 6 महिने असले तरी देखील तानावडे यांना पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे.