दरमहा 18 हजारांची नोकरी देण्याचे सांगून बेरोजगार महिलांची फसवणूक
प्रतिनिधी/ बेळगाव
फसवणूक प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेल्या ठकसेनाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला न्यायाधीशांसमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
ऋषभ दिवाकर आल्वा (रा. पंचवटी कॉलनी, शिमोगा) असे त्याचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी फसवणूक प्रकरणी त्याला अटक केली. अटकेची कारवाई पूर्ण करून त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
दरमहा 18 हजारांची नोकरी देण्याचे सांगून बेरोजगार महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांसमोर त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. कारण त्याच्याजवळ वेगवेगळे पत्ते दर्शविणारी आधारकार्डे आढळून आली आहेत. त्यामुळे त्याचा नेमका ठावठिकाणा कोणता? याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.
सुधा बडीगेर (मुळची रा. उगरगोळ, सध्या रा. भाग्यनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर भा.दं.वि. 420 कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी ऋषभ आल्वा याला अटक केली आहे. त्याच्याजवळ आढळून आलेल्या कागदपत्रात दिवाकर आल्वा असा उल्लेख आहे. त्याने आपल्या व आपल्या कुटुंबीयांविषयी अधिक माहिती दिली नसल्याचे समजते.