आफ्रिका 4 गड्यांनी विजयी, हेन्रिक क्लेसन सामनावीर, हॉप-क्लेसन संयुक्त मालिकावीर
वृत्तसंस्था/ पोश्चेस्ट्रुम
यजमान दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील मंगळवारी खेळवण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने विंडीजचा 4 गड्यांनी पराभव केला. द. आफ्रिकेच्या हेन्रिक क्लेसनने नाबाद शतक नोंदवून या सामन्यात ‘सामनावीर’ तसेच विंडीजच्या शाय हॉपसमवेत संयुक्त ‘मालिकावीर’ असा दुहेरी पुरस्कार मिळवला.
या शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजचा डाव 48.2 षटकात 260 धावात आटोपला. त्यानंतर द. आफ्रिकेने 29.3 षटकात 6 बाद 264 धावा जमवत आपला विजय नोंदवत ही मालिका बरोबरीत राखली.
विंडीजच्या डावामध्ये सलामीच्या किंगने 72 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह 72, मेयर्सने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, ब्रुक्सने 2 चौकारासह 18 कर्णधार हॉपने 1 चौकारासह 16, पुरनने 41 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 39, पॉवेलने 2, जेसन होल्डरने 43 चेंडूत 3 चौकारासह 36, कॅरेने 6, अकिल हुसेनने 1 चौकारासह 14, ओडेन स्मिथने 3 चौकारासह 17 धावा जमवल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेतर्फे जेनसेन आणि फॉर्च्युन, कोझी यांनी प्रत्येकी 2 तर एन्गिडी, पार्नेल, मार्व्रेम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले चार फलंदाज 87 धावात तंबूत परतले होते. क्लेसनने डेव्हिड मिलरसमवेत पाचव्या गड्यासाठी 55 धावांची भर घातली. मिलर बाद झाल्यानंतर क्लेसनला जेनसेनकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. क्लेसनने 61 चेंडूत 5 षटकार आणि 15 चौकारासह नाबाद 119 धावा झोडपल्या. जेनसेनने 33 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 43 धावा जमवल्या. झोर्जीने 22 चेंडूत 3 चौकारासह 21, व्हॅन डेर ड्युसेनने 3 चौकारासह 14, कर्णधार मार्व्रेमने 1 षटकार आणि 3 चौकारासह 25, मिलरने 2 चौकारासह 17, पार्नेलने नाबाद 4 धावा जमवल्या. विंडीजतर्फे जोसेफ 50 धावात 3, अकिल हुसेनने 49 धावात 2 तर मेयर्सने एक गडी बाद केला. द. आफ्रिकेच्या डावात 10 षटकार आणि 30 चौकार नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 48.2 षटकात सर्वबाद 260 (किंग 72, मेयर्स 14, ब्रुक्स 18, हॉप 16, पुरन 39, होल्डर 36, अकिल हुसेन 14, ओ. स्मिथ 17, जेनसेन 2-46, फॉर्च्युन 2-46, कोझी 2-53, एन्गिडी 1-45, मार्व्रेम 1-30), द. आफ्रिका 29.3 षटकात 6 बाद 264 (क्लेसन नाबाद 119, झोर्जी 21, व्हॅन डेर ड्युसन 14, मार्व्रेम 25, मिलर 17, जेनसेन 43, पार्नेल नाबाद 4, जोसेफ 3-50, अकिल हुसेन 2-49, मेयर्स 1-12).