हू चुनहुआ होऊ शकतात पंतप्रधान
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीसी) बीजिंगनजीक बीदायहे येथे पार पडलेल्या विशेष बैठकीतून काही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. पक्षाची ही बैठक महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या पुढील महाअधिवेशनादरम्यान वरिष्ठ पदांसाठी होणाऱया निवडणुकीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. सीपीसीचे महाअधिवेशन ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
सीपीसीच्या बैठकीनंतर एका नावावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उपपंतप्रधान हु चुनहुआ यांची ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यात आहे. पक्षाच्या महाअधिवेशनानंतर पंतप्रधानपद सोडणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान ली केचियांग यांनी यापूर्वीच केली आहे. तर हू चुनहुआ हे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे समर्थक मानले जात नाहीत. याचमुळे चुनहुआ पंतप्रधान झाल्यास क्षी जिनपिंग यांना तो मोठा झटका असल्याचे मानले जाईल.
बीदायहे येथे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची दरवर्षी अनौपचारिक बैठक होते. यात औपचारिक निर्णयांपूर्वी परस्परांमध्ये सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या बैठकीनंतर जिनपिंग हे लाओनिंग प्रांतात गेले. तर पंतप्रधान ली केचियांग हे ग्वांगदोंग प्रांतातील एका बैठकीत सामील झाले. पक्षाचे दोन्ही वरिष्ठ नेते बीदायहे बैठकीतून सर्वप्रथम बाहेर पडल्याने त्यांचा विरोधी गट बळकट झाला असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सीपीसीचे महाअधिवेशन दर 5 वर्षांनी होत असते. पुढील महाअधिवेशनात जिनपिंग यांना सलग तिसऱया कार्यकाळासाठी पक्ष महासचिव आणि अध्यक्ष म्हणून निवडले जाणार असल्याचे मानले जातेय. परंतु हु चुनहुआ पंतप्रधान झाल्यास जिनपिंग यांचा पक्षावरील एकाधिकार संपल्याचे मानले जाईल. क्षी जिनपिंग यांनी पक्षात बाजूला टाकलेल्या गटाशी चुनहुआ हे संबंधित आहेत.
4 उपपंतप्रधानांपैकी एक
हू सध्या चार उपपंतप्रधानांपैकी एक आहेत. पक्षाच्या 25 सदस्यीय पॉलिट ब्युरोचे ते सदस्य आहेत. आर्थिक नियोजनात त्यांना तरबेज मानले जाते. याचमुळे पंतप्रधानपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. पक्षातील बहुतांश गट त्यांनाच समर्थन देत आहेत. चुनहुआ हे भविष्यात क्षी जिनपिंग यांचे उत्तराधिकारी ठरणार असल्याचे मानले जात आहे.