वेलसांव येथील सभेत गोंयचो एकवोटचा इशारा
प्रतिनिधी/ वास्को
रेलमार्ग दुपदरीकरण विरोधकांनी रविवारी वेलसांव भागात सभा घेऊन दुपदरीकरण विरोधी चळवळ वाढवणार असल्याचा ईशारा सरकारला दिला. या सभेला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि माजी आमदार एलिना साल्ढाना यांनीही उपस्थिती लावली होती.
गोव्यात सध्या रेलमार्ग दुपदरीकरणाच्या कामाने वेग घेतलेला आहे. या कामासाठीच दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. याच पाश्वभूमीवर मुरगाव तालुक्यातून सर्वात जास्त विरोध होत असलेल्या वेलसांव गावात रविवारी गोंयचो एकवोट या रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी संघटनेने सभा घेतली व दुपदरीकरणाच्या कामाला तीव्र विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत या भागात दुपदरीकरणाचे काम केले जाऊ देणार नाही नसल्याचे यावेळी बजावण्यात आले. गोव्यात कोळशाचा वापर होणार उद्योग नाही. गोव्याला कोळशाची गरज नाही. त्यामुळे कोळसा गोव्यात नको. कर्नाटक किंवा महाराष्ट्राला कोळशाची गरज असल्यास कोळसा त्या राज्यात पाठवण्यात यावा. स्थानिक नागरिकांचा रेल्वे दुपदरीकरण आणि कोळशाला यापूर्वीही विरोध होता. आताही आहे आणि यापुढेही राहिल. कोळसा आणि रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी चळवळ वाढवण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात ही चळवळ सुरू होईल असा ईशारा यावेळी वक्त्यांनी दिला.
कोळसा आयात आणि रेलमार्ग दुपदरीकरणामुळे केवळ राज्याचे पर्यावरण नष्ट होणार आहे. आपापल्या गावांच्या हितरक्षणासाठीच आता गावातील लोक बाहेर पडू लागलेले आहेत. सरकारने गोव्यातील जनतेचा आवाज ऐकावा अशी मागणी या सभेत करण्यात आली. या सभेला आमदार विजय सरदेसाई तसेच माजी आमदार एलिना साल्ढाना यांनीही उपस्थिती लावली होती. त्यांनी व ओलान्सीया सिमोईस, जयेश शेटगावकर व अन्य कार्यकर्त्यांनी या सभेत कोळसा आणि रेलमार्ग दुपदरीकरणविरोधी विचार मांडले.