रिंगण पाहण्यासाठी किणये पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी : ज्ञानोबा माउली तुकाराम-टाळ मृदंगाचा गजर
वार्ताहर /किणये
ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ मलप्रभा परिसर बेळगाव दक्षिण व पश्चिम विभाग किणये या मंडळातर्फे आयोजित 36 व्या पारायण सोहळ्dयानिमित्त सोमवारी ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा उत्साहात झाला. गोल व उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांनी गर्दी केली होती.
टाळ-मृदंगाचा गजर तसेच ज्ञानोबा माउली तुकाराम असा जयघोष करीत बहाद्दरवाडी क्रॉस ते किणये मुख्य रस्त्यावर उभे रिंगण झाले. मराठा मंडळ कॉलेजच्या बाजूला असलेल्या शिवारात गोल रिंगण झाले.
रिंगणातून अश्व धावल्यानंतर अश्वांच्या पायाखालची माती कपाळावर लावून घेताना भाविक दिसत होते. माउली माउली असा जयघोष करत होते.
मोफत ग्रंथ
गेल्या सात दिवसापासून बहाद्दरवाडी क्रॉस येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. सोमवारी पहाटे काकडारती झाली. यावेळी महिला आरती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पारायण सोहळ्यात ग्रंथ वाचणाऱ्या इच्छुकांना मंडळाच्यावतीने मोफत ग्रंथ दिला. अक्कलकोट येथील गुरुनाथ महाराज यांचे कालाकीर्तन झाले. त्यानंतर मनपाभोवती दिंडी प्रदक्षिणा झाली. माउलींच्या अश्वांचे पूजन विविध मान्यवरांनी केले.
पारायणात 40 गावांचा सहभाग
पारायण सोहळ्यात सुमारे 40 गावांचा सहभाग असल्यामुळे सांगता सोहळ्यात भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप सुरू होते. पारायणात महाराष्ट्रातील विविध प्रवचन व कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तन आकर्षक ठरली. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्माचा जागर या भागात केला. विविध प्रकारची खेळणी, आईक्रीमचे स्टॉल उभारण्यात आले होते.