Tarun Bharat

आशिया चषक ठरणार वर्ल्डकपची रंगीत तालीम!

केएल राहुल सलामीला व कोहली तिसऱया स्थानी आल्यास मध्यफळीत डच्चू कोणाला?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

साधारणपणे वर्षभरापूर्वी भारतीय संघातील विराट कोहलीच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे कल्पनेच्या पलीकडचे होते. पण, अवघ्या वर्षभरातच सारे चित्र बदलले आणि जो विराट संघाचा अविभाज्य घटक होता, त्याला अगदी फॉर्मसाठी झगडावे लागते आहे. यादरम्यान, केएल राहुल सलामीला व विराट कोहली तिसऱया स्थानी उतरेल, हे निश्चित केले गेले तर मध्यफळीत कोणाला वगळणार, हा मोठा पेच निवडकर्त्यांना सोडवावा लागेल. आगामी आशिया चषक स्पर्धेच्या माध्यमातून वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची जडणघडण निश्चित होऊ शकेल, असे सध्याचे चित्र आहे.

गतवर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारताची दाणादाण उडाली आणि यामुळे एकच सनसनाटी निर्माण झाली नसती तरच नवल होते. केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली हे पहिले 3 आदर्श फलंदाज आहेत का, याबद्दलही त्यावेळी चर्चा सुरु झाली. आता त्या स्पर्धेला दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी भारतीय संघव्यवस्थापनासमोर प्रश्न मात्र तेच कायम आहेत.

आगामी आशिया चषक, टी-20 वर्ल्डकपमध्येही भारत अपेक्षा पूर्ण करु शकला नाही तर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांना देखील अंतिम एकादशमधील आपले स्थान कायम राखणे कठीण जाऊ शकते.

पंत ‘एक्स-फॅक्टर’मध्ये मोडणारा खेळाडू असून सूर्यकुमार यादव 360 डिग्री हिटर आहे तर दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून नावारुपास आला आहे. या पार्श्वभूमीवर, कोहली किंवा राहुलला स्थान देण्यासाठी या तिघांपैकी एकाला डच्चू देणे भारताला परवडणार का, याचे तूर्तास निवडकर्त्यांकडे कोणतेही उत्तर नाही.

हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा यांचे अष्टपैलू म्हणून स्थान अबाधित आहे आणि किमान चार स्पेशालिस्ट गोलंदाज लाईनअपमध्ये क्रमप्राप्त असतील. पाच स्पेशालिस्ट फलंदाज आवश्यक असतील. त्यामुळे, वगळणार कोणाला, हा पेच समोर असेल.

मागील वर्षातील टी-20 वर्ल्डकपनंतर कोहलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये केवळ चारच सामने खेळले असून यात त्याने 17, 52, 1 व 11 अशा किरकोळ धावा जमवल्या.

निवड समिती कोहलीला ते ‘स्वातंत्र्य’ देणार का?

एरवी, कोहली सेट होण्यासाठी थोडा कालावधी घेतो आणि त्यानंतर त्याची फलंदाजी बहरते. पण, अलीकडे तो सेट होण्यापूर्वीच सातत्याने स्वस्तात बाद होत राहिला असून या पार्श्वभूमीवर निवड समिती त्याला थोडेसे सेट झाल्यानंतर  फटकेबाजीला सुरुवात करण्याचे स्वातंत्र्य यापुढेही देणार की, त्यापूर्वी एखादा कठोर निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

आश्चर्य म्हणजे, संघाची फिलॉसॉफी बदलत असताना त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी रोहित, सूर्यकुमार यांनी मागील कालावधीत आपल्या फलंदाजी शैलीत आक्रमक बदल केले आहेत आणि अपवाद वगळता यात ते यशस्वी देखील झाले आहेत. दुसरीकडे, यामुळे कोहलीवरील दडपणात आणखी जणू भरच पडली आहे!

केएल राहुलची पुनरागमनाची घाई कशासाठी?

वास्तविक, केएल राहुल झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत खेळणार नाही, असेच यापूर्वीचे संकेत होते. मात्र, त्यानंतर अचानक त्याने आपण झिम्बाब्वे दौऱयासाठी उपलब्ध असल्याचे घाईघाईने कळवले आणि तो यासाठी घाई का करतो आहे, असा प्रश्न निर्माण झाला.

व्यवस्थापनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलला झिम्बाब्वेविरुद्ध माघार घेतली असती तर आशिया चषक स्पर्धेत दि. 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही ‘मॅच प्रॅक्टिस’शिवाय मैदानात उतरण्याचा धोका पत्करावा लागला असता आणि ही जोखीम टाळण्यासाठीच त्याने घाईघाईने का होईना, पण, झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्याची तयारी केली आहे. केवळ फॉर्मचा विचार केला तर केएल राहुल मागील कित्येक वर्षे आयपीएलमध्ये रनमशिनप्रमाणे खेळत आला आहे आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची सरासरी 142 इतकी उत्तम राहिली आहे.

रिषभ पंत? सूर्यकुमार की दिनेश कार्तिक?

रिषभ पंतचा 54 टी-20 सामन्यातील स्ट्राईकरेट 126 च्या आसपास राहिला असून क्रिकेट केवळ आकडेवारीचा खेळ असता तर पंतला डोळे बंद करुन संघातून वगळले गेले असते. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सामन्याच्या दिवशी एखाद्या खेळाडूने जादूमय खेळ साकारत विजय मिळवून दिला तर त्याचे खास महत्त्व असते. कपिलने 1983 मध्ये नाबाद 175 धावांची विजयी खेळी साकारली, त्याला तोड नाही. या पार्श्वभूमीवर, पंतसारखा खेळाडू एखाद्या लढतीत अशी जादू साकारेल, असा व्यवस्थापनाला विश्वास वाटत आला आहे.

दुसरीकडे, सूर्यकुमार रॅम्पवॉक करत फटकेबाजी करु शकतो. शेवटच्या क्षणी मनगटाची दिशा बदलत अगदी स्क्वेअरकडे उत्तुंग षटकार खेचू शकतो आणि पूलचे फटके तितक्याच ताकदीने फटकावू शकतो. याशिवाय, तंदुरुस्ती हे त्याचे बलस्थान आहे.

राहतो प्रश्न दिनेश कार्तिकचा तर त्याने याला अगदी चपखल उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, ‘माझा खेळ हाय-रिस्क सामन्यांमध्येच हमखास बहरतो’!

या पार्श्वभूमीवर, कोहली व राहुल यांचा खेळ कुठे आहे, असा प्रश्न आ वासून उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही!

आशिया चषकात सहभागी भारतीय खेळाडूंची जानेवारीपासूनची कामगिरी

खेळाडू / सामने / धावा / सर्वोत्तम / सरासरी

विराट कोहली / 4 / 81 / 52 / 20.25

रोहित शर्मा / 13 / 290 / 64 / 24.16

सूर्यकुमार यादव / 12 / 428 / 117 / 38.90

दीपक हुडा / 9 / 274 / 104 / 54.80

रिषभ पंत / 13 / 260 / 52 / 26.00

दिनेश कार्तिक / 15 / 192 / 55 / 21.33

हार्दिक पंडय़ा / 13 / 281 / 51 / 31.22

रविंद्र जडेजा / 7 / 166 / 46ना. / 55.33

आशिया चषक इतिहासात सर्वाधिक धावा जमवणारे भारतीय फलंदाज

फलंदाज / धावा

सचिन तेंडुलकर / 971

रोहित शर्मा / 883

विराट कोहली / 766

महेंद्रसिंग धोनी / 690

युवराज सिंग / 613.

Related Stories

2011 वर्ल्डकप विजयाच्या आठवणींना उजाळा

Patil_p

मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ‘ऑफिसर ईन ऑर्डर’

Patil_p

सेरेनाकडून विम्बल्डनमध्ये पुनरागमनाचे संकेत

Patil_p

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताला कांस्यपदक

Patil_p

‘तो’ निर्णय निवडकर्त्यांचा : अध्यक्ष सौरभ गांगुली

Amit Kulkarni

सौराष्ट्रचा मुंबईवर निर्णायक विजय

Patil_p