50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार स्पर्धा, वेळापत्रक व यजमान अद्याप अनिश्चित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे आशियाई क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) गुरुवारी जाहीर केले. यावेळी ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र स्पर्धेचे वेळापत्रक व यजमान देशाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
यावर्षी होणाऱया या स्पर्धेचे अधिकृत यजमान पाकिस्तान होते. पण बीसीसीआयने राजकीय तणावाच्या कारणास्तव पाकमध्ये खेळण्यास नकार दर्शविल्याने या स्पर्धेचा नवा यजमान अजून निश्चित करण्यात आलेला नाही. पीसीबीचे अध्यक्ष रमिझ राजा यांनी भारताच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून भारतात होणाऱया वनडे वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला होता. पण आता राजा यांना अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले असून त्यांच्या जागी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आल्याने पाकच्या या भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेली टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन आशिया चषक स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये घेण्यात आली होती. यावर्षी भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने त्याच्या तयारीचा विचार करून आशिया चषक स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये घेण्याचा निर्णय एसीसीने घेतला आहे. पुढील दोन वर्षाचे कॅलेंडर जाहीर करताना एसीसी अध्यक्ष व बीसीसीआय सचिव जय शहा म्हणाले की, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेत आम्ही आशिया चषकाचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला आहे. आशियाई देशातील खेळाडू त्यात शानदार प्रदर्शन करण्याची तयारी करीत असल्याने या स्पर्धेत दर्जेदार क्रिकेट पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे.
पुढील दोन वर्षाच्या कालावधीत एकूण 145 वनडे व टी-20 सामने खेळविले जाणार असल्याचे एसीसीने जाहीर केले. त्यापैकी 2023 मध्ये 75 आणि 2024 मध्ये 70 सामने होतील. याशिवाय यू-23 एमर्जिंग आशिया चषक स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येणार असून वनडे (50 षटके) फॉरमॅटमध्ये ती खेळविली जाईल. यावर्षी जुलैमध्ये होणाऱया या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असेल. पुढील वर्षी ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होईल, पण ती टी-20 फॉरमॅटमध्ये घेतली जाईल. तसेच यावर्षी जूनमध्ये महिलांची एमर्जिंग आशिया चषक स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये होणार असून त्यातही आठ संघांचा सहभाग असणार आहे.