बारामुल्ला येथे टीआरएफचे 2 दहशतवादी अटकेत
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेजिस्टेंट प्रंट (टीआरएफ)च्या 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा तसेच आक्षेपार्ह सामग्री हस्तगत झाली आहे. खुर्शीद अहमद आणि रेयाज अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही बारामुल्लाच्या जंदपाल कुंजर येथील रहिवासी आहेत.
कुंजर गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती बारामुल्ला पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफच्या 176 बटालियनच्या पथकाने संयुक्तपणे गावात शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून एके-47 हस्तगत झाली आहे.
शोधमोहिमेदरम्यान प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे पोस्टरही हस्तगत करण्यात आले आहे. टीआरएफसाठी कारवाया करत असल्याचे चौकशीदरम्यान या दोन्ही दहशतवाद्यांनी सांगितले आहे. तर जप्त करण्यात आलेल्या दारूगोळय़ाचा वापर नजीकच्या परिसरात दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणार होता अशी कबुली या दहशतवाद्यांनी दिली आहे. पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायदा तसेच युएपीए अंतर्गत गुन्हे नेंदविले आहेत.