लक्ष्मी पूजन, तुळशी विवाहासाठी मागणी : आवक वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मीपूजन आणि तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी फुलांची आवक वाढली होती. झेंडू, शेवंती, गुलाब, गलाटा यासह सुटय़ा फुलांनाही पसंती दिली जात होती. बाजारात रंगीबेरंगी फुलांचे आकर्षण होते. दिवाळीनिमित्त पूजा आणि तुळशी विवाहाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे फुलांना मागणी वाढली आहे.
दिवाळीचा पाडवा व लक्ष्मी पूजनादरम्यान 70 टन फुलांची विक्री झाली होती. दिवाळीपासून बाजारात फुलांची आवक वाढली आहे. सोमवारी जिजामाता चौकात रंगीबेरंगी फुले, हार दाखल झाले होते. त्यामुळे परिसर फूल मार्केट बनला होता. दिवाळीतील पूजन आणि तुळशी विवाहासाठी फुलांची आणि हारांची गरज असते. त्यामुळे या काळात मागणी वाढलेली असते. या पार्श्वभूमीवर सोमवारी फुलांची आवक वाढली होती. शिवाय फुलांची आणि हारांची विक्री अधिक प्रमाणात झाली.
दिवाळीच्या काळात विशेषतः झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते. त्यामुळे बाजारात झेंडूची फुले अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. तुळशी विवाह सोहळय़ाचा मुहूर्त मंगळवार दि. 8 रोजीच्या पौर्णिमेपर्यंत आहे. त्यामुळे सोमवारी शहरात तुळशीचे विवाह अधिक प्रमाणात पार पडले. याबरोबर इतर पूजेच्या साहित्याला आणि उसाला मागणी वाढली होती. तुळशी विवाहासाठी बाजारात विविध ठिकाणी उसाची विक्री झाली. साधारण 60 ते 70 रुपयांना 5 ऊस याप्रमाणे विक्री सुरू होती.