पूर्वसंध्येला राज्यात भरगच्च कार्यक्रम नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन
पणजी /प्रतिनिधी
दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपावली उत्सवाला आजपासून गोव्यात प्रारंभ होत आहे. आज सायंकाळी दीपावलीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण गोव्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गोव्यातील दिवाळीचे खास वैशिष्टय़ असलेले नरकासुर प्रतिमा जागोजागी उभ्या केले आहेत त्याची मिरवणूक तसेच त्यानिमित्त संपूर्ण गोवाभर स्पर्धांचे आयोजन केले आहे. तथापि या उत्सवावर पावसाचे विरजण पडण्याची शक्मयता वाढली आहे.
राज्यात आज दिवाळीला प्रारंभ होत असून संपूर्ण गोवा या दीपोत्सवाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यात दिवाळी उत्सवानिमित्त संपूर्ण गोवाभर नरकासुर प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत आणि आज सायंकाळी नरकासुर प्रतिमांची अनेक ठिकाणी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्येदेखील प्रतिमा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत अनेक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची धम्माल होणार आहे. तथापि गेले काही दिवस कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने सर्वांची धांदल उडविली असून या उत्सवावर पावसाने विरजण टाकले आहे. गेले कित्येक दिवस, रात्री उशिरापर्यंत जागरण करून मुलांनी नरकासुर प्रतिमा बनवल्या होत्या. मुसळधार पावसाने येथील अनेक प्रतिमा भिजल्या आणि काहींनी तर दहनापूर्वीच माना टाकल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी देखील हिरमुसून बसली आहे. तथापि अनेकांनी ताडपत्रीचे आवरण घालून नरकासुर प्रतिमा पावसापासून वाचविल्या आहेत. अशा या प्रतिमांची आज गोव्यातील विविध भागात मिरवणुका तसेच त्यानिमित्त स्पर्धांचेही भरगच्च आयोजन केलेले आहे .रात्री उशिरापर्यंत स्पर्धा व त्यांचे निकाल झाल्यानंतर पहाटे या नरकासुर प्रतिमांचे दहन केले जाईल व सर्वत्र पणत्या प्रज्वलित करून सोमवारी पहाटे दिवाळी उत्सवाला प्रारंभ होईल.
चैतन्यदायी वातावरण
दिवाळीनिमित्त राज्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी घरादारावर विद्युतरोषणाई केली आहे, तर बहुतांश घरांवर शनिवारी रात्रीच आकाशकंदील लावण्यात आले आहे. राज्यातील दिवाळी उत्सवाची धूम खऱया अर्थाने आज सायंकाळपासून सुरू होईल तथापि पाऊस नेमका किती साथ देतो हे पाहावे लागेल कारण आज देखील पावसाची शक्मयता नाकारता येत नाही.
दिवाळीनिमित्त घरोदारी विविध फराळाचे पदार्थ चकली, लाडू, शंकरपाळी, चिवडा असे विविध प्रकार घरोघरी चालू आहे. सोमवारी पहाटे दिवाळीला प्रारंभ झाल्यानंतर अभ्यंगस्नान त्यानंतर ओवाळणी व पोह्यांचे विविध पदार्थ यांचाच मस्तपैकी फराळ होणार आहे.
दरम्यान. आज सायंकाळी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल तसेच भव्य दिव्य नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी हजारो माणसे दुचाकी तसेच चार चाकी वाहने घेऊन फिरत राहणार असल्याने पोलिसांनी आपला बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. आज मोठय़ा प्रमाणात पोलीस फौज विविध सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दखल घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहिली आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्यावेळी वेगाने गाडी चालवून मोठे अपघात होऊ नयेत यासाठी देखील वाहतूक पोलीस आज कडकपणे काही उपाययोजना आखणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.