गाबित विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या भावना
मालवण/प्रतिनिधी –
गाबित समाजातील कित्येक विद्यार्थ्यांना १९६७ पूर्वीच्या पुराव्याअभावी जातपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आजच्या दहावी आणि शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणगौरव सोहळ्यातही असे विद्यार्थी आणि पालक उपस्थित आहेत की ज्यांना जात पडताळणी समस्या भेडसावतेय. खरेतर आजच्या गौरव सोहळ्यात उपस्थित प्रत्येक विद्यार्थी आणि पालक हा गाबित आहे. त्यांना ‘गाबित समाज मालवण’ या नावाने दिलेले सन्मानचिन्ह हे तर ते गाबित असल्याचेच प्रमाण आहे. मग अजून कुठले पुरावे शासनाला हवे. आम्ही गाबित आहोत म्हणूनच या कार्यक्रमाला हजर राहिलो, अशी कैफियत गाबित समाज बांधवांकडून गुणगौरव सोहळ्यात मांडण्यात आली. मामासाहेब वरेरकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या या सोहळ्यास माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा नियोजन सदस्य हरी खोबरेकर, चंद्रशेखर उपरकर, मुख्याध्यापक निशिकांत पराडकर, मनोज खोबरेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, उदय घाटवळ, बाबा ढोके, सेजल परब, पूजा सरकारे, सुमेधा धुरी, नाना कुमठेकर, राधीका कुबल, रविकिरण तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.