पंतप्रधान बेनेट यांच्या आघाडीत फूट ः 3 वर्षांमध्ये पाचव्यांदा होणार निवडणूक
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे सरकार कोसळणार आहे. त्यांच्या आघाडीत फूट पडल्याने लवकरच निवडणूक होणार आहे. नफ्ताली बेनेट आणि विदेश मंत्री यायिर लापिद यांच्या पक्षांदरम्यान आघाडी सरकार सुरू आहे. इस्रायलमध्ये आता 3 वर्षांमध्ये पाचव्यांदा निवडणूक होणार आहे.
बेनेट आणि लापिद यांनी संयुक्त वक्तव्य जारी करत आघाडी संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. आघाडीदरम्यान झालेल्या तडजोडीनुसार पुढील निवडणुकीपर्यंत यायिर लापिद हे काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत. इस्रायलमधील उजव्या विचारसरणीच्या यमिना पार्टीचे बेनेट हे नेते आहेत. तर यायिर लापिद हे यश अतिद नावाच्या पक्षाचे प्रमुख आहेत.
बेनेट सरकार पूर्वीच अल्पमतात होते, त्यांच्याकडे विरोधी पक्षांपेक्षा केवळ एक मत अधिक होते. बेनेट सरकारच्या बाजूने 60 तर विरोधात 59 मते पडली होती. अशा स्थितीत यायिर लापिद यांच्या पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमध्ये दोन वर्षांमध्ये 4 सरकारे अल्पमतात आल्याने वारंवार निवडणूक घ्यावी लागली आहे.
घटकपक्ष नाराज
8 पक्षांच्या आघाडीत सामील युनायटेट अरब लिस्ट पार्टी पॅलेस्टाइनप्रकरणी बेनेट सरकारवर नाराज आहे. पॅलेस्टिनी वस्तींप्रकरणी सरकारसोबत या पक्षाचा वाद झाला होता. बेनेट सरकार पॅलेस्टिनी वस्तींमध्ये ज्यूंना स्थान देत असल्याचा आरोप या पक्षाने केला होता.
नेतान्याहू यांना संधी
इस्रायलमध्ये सत्तासंकट निर्माण झाल्याने माजी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू पुन्हा सरकार स्थापन करू शकतात असे मानले जत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना दोन खासदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.