वृत्तसंस्था / पंचकुला
भारतीय जनता पक्षाने आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वेगाने हालचाली करण्यास प्रारंभ केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न ड्डा यांनी हरियाणातील पंचकुला येथे शनिवारी भव्य रोड शो केला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अनेक नागरीकांनी गर्दी केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरियाणा राज्य भाजपचे अध्यक्ष नायब सिंग सैनी हे या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे हरियाणा प्रभारी बिप्लव कुमार देव, ज्येष्ठ पक्षनेते ओमप्रकाश धनकर, राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि पंचकुलाचे आमदार ग्यानचंद गुप्ता यांनीही रोड शोमध्ये सहभाग घेतला.
या रोड शोला जनतेचा जो प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तो पाहता जनतेचा कल कोणाकडे आहे, हे स्पष्ट होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वशक्तीनिशी उतरणार असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही मतदार कौल देतील. विरोधी पक्षांनी केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावर बिनबुडाची टीका करणे, हेच ध्येय ठेवले असून लोक या पक्षांना त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन गुप्ता यांनी केले.