आकार पाहून लोक होतात अचंबित
पाळीव प्राणी स्वतःच्या ‘क्यूटनेस’मुळे ओळखले जातात. अनेक जण तर स्वतःच पाळीव प्राण्यांवर मुलासारखे प्रेम करतात. कुणाचा श्वान छोटा असतो तर कुणाचे मांजर केसाळ असते. परंतु एका मांजराला पाहून सगळेच जण अचंबित होत आहेत. रशियात राहणाऱया युलियाने स्वतःच्या पाळीव प्राण्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. हे मांजर युलियाच्या दोन वर्षीय मुलीइतके मोठे आहे.
युलियाच्या मांजराला जगातील सर्वात मोठे मांजर म्हणून ओळखले जाते. हे मांजर स्वतःच्या दोन पायांवर उभे राहिल्यास त्याची उंची युलियाच्या दोन वर्षीय मुलीइतकी होते. युलियाने या मांजराची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्यावर त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इंटरनेटवर ही छायाचित्रे पाहून लोक अचंबित झाले आहेत. अनेक जण तर त्याच्या उंचीमुळे त्याला श्वानच समजत आहेत. युलियाने स्वतःच्या मांजराला केफिर हे नाव दिले आहे.
अत्यंत शांत
लोक केफिरच्या उंचीमुळे त्याला घाबरतात. परंतु हे अत्यंत शांत आणि शालीन मांजर आहे. सर्वसाधारण मांजराच्या तुलनेत याची उंची दुप्पट आहे. तसेच त्याला लोकांजवळ राहणे आवडते. माझ्या मुलीसोबत ते उभे राहिल्यास त्यांची उंची समान जाणवत असल्याचे युलिया यांनी सांगितले आहे. युलियाने अलिकडेच सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून यात युलियाची मुलीसोबत मांजर टेबलच्या मदतीने उभे असल्याचे दिसून येते.
लोकांना आवडली जोडी
युलियाची मुलगी आणि केफिर यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनाच पसंत पडली आहे. ‘स्वीट कपल’ असे युलियाने छायाचित्राच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. युलियानुसार दोघांनाही एकमेकांचा कधीच कंटाळा येत नाही. माझी मुलगी किचनमध्ये काही करत असल्यास केफिर शांत राहून तिच्याकडे पाहत बसते. केफिरला बहुतांशवेळा मुलगीच अन्न भरवत असते असे युलिया सांगते. युलियाचु मुलगी या मांजराला बघून घाबरत नाही हीच मोठी गोष्ट असल्याचे लोकांनी कॉमेंटमध्ये म्हटले आहे.