ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे गटाने पाठिंबा काढल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. हे सरकार वाचविण्याचे तिन्ही पक्षांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असतानाच नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 2-3 दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल आणि आषाढीची विठ्ठल रुक्मिणीची महापूजा देवेंद्र फडणवीसच करतील, असे चिखलीकर यांनी म्हटले आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी चिखलीकर आज पंढरपुरमध्ये आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. हे सरकार पडेल. येत्या 2-3 दिवसात एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत भाजपचे सरकार सत्तेत येईल. केवळ शिवसेनेचे आमदारच नाही तर 10-12 खासदारही भाजपात येतील.
बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्यामुळे त्यांनी निश्चिंत रहावे. यंदाची आषाढी एकादशी महापूजा कोण करणार? याबाबत विचारले असता, त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच यंदा विठ्ठल रुक्मीणीची महापूजा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.