Tarun Bharat

राजकीय कोंडीचेच जिल्हय़ातही पडसाद

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत छुपा संघर्षापेक्षा भाजपची साथ वाटली महत्वाची
विधानसभा निवडणुकीसह राजकीय भवितव्य लावले पणाला

कोल्हापूर : संतोष पाटील

जिह्यातील राजकारणात दोन्ही कॉंग्रेसकडून शिवसेनेला गृहीत धरुनच वाटचाल सुरू असल्याची खदखद शिवसेनेत आजही आहे. तालुक्यातील राजकारण करताना भविष्यात दोन्ही काँग्रेसशी एकहात करावे लागणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे दोन्ही काँग्रेससोबत छुपा संघर्ष करुन धायकुतीला आलेल्या सेनेच्या काही वाघांनी जिह्याचे राजकारण समोर ठेवूनच राजकारणात सवता सुभा मांडला आहे. प्रकाश आबिटकर असो वा अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा माजी आमदार असोत यांची कथित बंडखोरी ही गटाच्या राजकारणात उठ्ठे काढण्यासाठी केलेली अपरिहार्यता होती का? हे बंडाचे फलीत आणि त्यानंतरची राजकीय वाटचालीनंतरच स्पष्ट होईल.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कोल्हापुरात होती. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने यात मिठाचा खडा पडला. काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतले. मात्र, शिवसेनेला वाढीव एक जागा दिली नाही, असा आरोप करत शिवसेने बँकेच्या निवडणुकीत सवता सुभा मांडला. तसेच शिवसेनेला खिंडार पाडण्यात दोन्ही काँग्रेसच्या जिह्यातील नेत्यांना यश आले. खरतरं शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा होती. दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेने झगडून अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या. गोकुळमध्ये खा. संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांचा आश्चर्यकारित्या पराभव झाला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासननियुक्त संचालकपदी निवड होवूनही संघातील एन्ट्री रोखली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील यांच्या निवडीत शिवसेनेने साथ दिल्यानंतरही पदाधिकारी निवडीत डावलले गेल्याची चंद्रदीप नरके गटाची भावना आहे.

जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस नुरा कुस्ती खेळून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवतील अशी सेनेच्या नेत्यांना भिती आहे. जिल्हय़ाच्या राजकारणावर वर्चस्व असणारे दोन नेते हे मातोश्रीवर असलेल्या संबंधांचा वापर करत जिह्यातील शिवसेना नेत्यांनी आणलेले आदेश पुन्हा फिरवत असल्याची खदखद शिवसेना पदाधिकाऱयात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपसह दोन्ही काँग्रेसचा सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. सर्वच निवडणुकांत दोन्ही काँग्रेससोबत समझोता केल्यास शिवसेनेच्या तालुक्यातील नेत्यांची विधानसभा निवडणुकीत गोची होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच बंडाची टायमिंग साधत शिवसेनेच्या जिह्यातील काही वाघांनी नवे रिणशिंग फुंकले असावे. तालुक्यातील राजकारणात दोन्ही काँग्रेससोबतच शिवसेनेचा सामना आहे. अडीच वर्षानंतर संघर्ष करावाच लागणार आहे. महाविकास आघाडीचा प्रयोगानंतर उमेदवारी मिळेल का नाही याचीही खात्री नसल्याचे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

तालुक्याच्या राजकारणातही त्रांगडे


खा. धनंजय महाडिक यांना विरोध म्हणूनच पालकमंत्री सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ हे खा. संजय मंडलिक यांना बळ देत होते. आता राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय संदर्भच बदलले. महाडिक खासदार झाल्याने शिवसेना किंवा महाविकास आघाडी म्हणून खा. संजय मंडलिक यांना दोन्ही काँग्रेसचे नेते त्यांना कितपत बळ देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल किंवा मंडलिक काय भूमिका घेतील हे देखील महत्त्वाचे आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेच्या मागे उभी राहिली तरच संसदीय वाट प्रशस्त होत असल्याचा अनुभव आहे. राज्यसभा निवडणुकीमुळे ऍक्टिव्ह झालेला महाडिक गट आणि भाजपची ताकद, राजू शेट्टी यांची भूमीका याचा प्रभाव या मतदार संघात लोकसभेला दिसून येईल.

महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणामुळे प्रत्येक तालुक्यात राजकीय त्रिकोण अस्तित्वात येत आहेत. भाजपमुळे जनुसराज्य आघाडीचे नेते आ. विनय कोरे आणि महादेवराव महडिक भाजपमुळे एकाच व्यावसपीठावर आहेत. शाहूवाडी, पन्हाळ्यातील राजकारणासाठी माजी आमदार सत्यजित पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. करवीरमध्ये आ. पी. एन. पाटील आणि चंद्रदीप नरके या दोन गटातच लढत होईल. महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यास पी. एन. पाटील की चंद्रदीप नरके यापैकी कोणाचा विचार होणार? महाविकासच्या प्रयोगामुळे नरके गटही अस्वस्थ आहे. कागल तालुक्यात ‘आमचं ठरलयं’चा नारा देत मंत्री हसन मुश्रीफ आणि खा. संजय मंडलिक एकत्र आले, असले तरी आता राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संदर्भ बदलले आहेत. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष निवडून आले. शिवसेनेने मंत्री केले. शिरोळ मतदार संघात शिवसेनेला यड्रावकर आणि स्वाभिमानीसह काँग्रेस सोबत करावा लागणार असल्याने सेनेत अवस्थता आहे. राधानगरी-भुदरगड-आजरा तालुक्यात आ. प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील, ए. वाय. पाटील गट विधानसभेला एकाच व्यासपीठावर एकदिलाने कसा येईल? हातकणंगलेत आ. राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर या लढतीत आता माजी आमदार राजीव आवळे हेही असतील. महाडिक गटाची ताकद हातकणंगलेत महत्वाची ठरणार आहे. चंदगड तालुक्यात आमदार राजेश पाटील यांना शिवसेनेसह भाजपचा सामना करावा लागेल. शहर उत्तरची निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून राजेश क्षीरसागर यांना माघार घ्यावी लागली. पोट निवडणुकीत वाढलेल्या मतांच्या टक्कामुळे ताकदवान झालेली भाजप आणि काँग्रेस या दोघांचा सामना राजेश क्षीरसागर म्हणजेच शिवसेनेला अडीच वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुकीत करावा लागणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे जिह्यातील राजकारणाची खिचडी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भरघोस निधी आणत सत्तेच्या सावलीत आपली मुळे भक्कम करत असतानाच जिह्यात शिवसेना वाऱयावर सोडल्याची खदखद जिह्यातील सेनेत आहे. याचाच परिपाक म्हणून शिंदे यांच्या बंडखोरील जिह्यातून हवा मिळाली.

म्हणूनच स्वतंत्र अस्तित्व

राजकीय अभिनिवेष बसणात गेल्याने कधी नव्हे इतकी जिह्याच्या राजकारणाची मिसळ पुढील काळात झालेली दिसेल. कोल्हापूर शहरात भाजपचा पराभव झाला तरी 42 हजारांवरुन 78 हजारांवर भाजपचा वाढलेला मताचा टक्का जिह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघातील इतर पक्षाच्या इच्छुकांचा ठोक चुकवणारा आहे. भाजपला राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या यशासह शिवसेनेच्या बंडाळीने स्फुर्लींग चढले आहे. महाविकास आघाडी म्हणून अडीच वर्षे एकत्र असलेल्या नेत्यांना पुढील काही महिन्यात होणारी महापालिकेची निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढावी लागणार आहे. एकत्र लढले आणि अन्याय झाला तर आपला आवाज मातोश्रीपर्यंत पोहचेल की नाही याची शंका जिह्यतील नेत्यांना आहे.

Advertisements

Related Stories

शिवसेनेच्या वाघांनी डरकाळी फोडली, पुण्यातील तानाजी सावंतांचं कार्यालय फोडले

Rahul Gadkar

आम्हीही याच देशाचे, आमचीही स्वतंत्र जनगणना करा : पंकजा मुंडे

Abhijeet Shinde

कोल्हापूरला‘महाराष्ट्र केसरी’ची 19 वर्षे हुलकावणी 

Abhijeet Shinde

सांगली : सांगली : मिरजेत लॉकडाऊनचा आदेश धुडकावून किराणा विक्री

Abhijeet Shinde

रंकाळा टॉवर पुन्हा दहशतीखाली…

Abhijeet Shinde

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

Sumit Tambekar
error: Content is protected !!