Tarun Bharat

‘ब्लड ऑन कॉल’ योजना सुरू करणे आवश्यक

Advertisements

अवघ्या चार तासांत मिळणार होते रक्त : सरकारच्या नव्या योजना अद्याप कागदावरच

प्रतिनिधी /बेळगाव

गरजू रुग्णाला ऐनवेळी रक्ताची गरज लागली की पळापळ सुरू होते. नातेवाईकांना रक्तदात्याचा शोध घेत फिरावे लागते. दरवेळी रक्तपेढय़ांमध्ये रक्त मिळेलच असे नाही. शिवाय त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचाही नेम नाही. अशा अवस्थेत राज्य सरकारने ‘ब्लड ऑन कॉल’ ही नवी योजना आखली होती. मात्र ती योजना अद्याप सुरूच झाली नाही. केवळ कागदी घोडे नाचवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या योजनेसाठी 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या 450 रुपयांत आपल्याला हवे असलेले रक्त उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र या योजनेचा शुभारंभ करण्यास प्रशासनाने विलंब केल्याचेच दिसून येत आहे. रक्त गटाचे महत्त्व रक्ताची गरज भासल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समजते. आवश्यक असणारे रक्तगट मिळविणे म्हणजे जणू ‘अमृत’ मिळविण्यासारखे असते. याचा विचार करून सरकारने ही योजना सुरू करण्यासाठी धडपड केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे.

योजनेबाबत झाली होती चर्चा

बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली होती आणि लवकरच ती कार्यान्वित करण्याचा मानस सरकारने आखला होता. यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबरही जारी केला होता. 104 या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर अवघ्या चार तासात रक्त पुरवठा करण्यात येईल. 40 कि.मी. अंतरापर्यंतच्या रुग्णाला केवळ चार तासातच त्याच्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध करून देण्याचा मानस सरकारचा होता. यासाठी केवळ 450 रुपयांमध्ये या रक्ताची सोय केली जाणार असून वाहतुकीचा खर्च म्हणून 100 रुपये आकारण्यात येणार होते.

रुग्णांना रक्ताची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता

रुग्णांवर शस्त्रक्रिया अथवा उपचारादरम्यान आवश्यक असणारे ठराविक गटाचे रक्त बऱयाचदा उपलब्ध नसते. रक्तासाठी पैसे खर्च करण्याची तयारी असते मात्र सहजासहजी आपल्याला हवे असणारे रक्त गटाचे रक्त मिळत नाही. ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने ब्लड ऍण्ड कॉलची योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अजूनही ही योजना सुरू झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मोठा अपघात घडला किंवा मोठी शस्त्रक्रिया घडली तर मोठय़ा प्रमाणात रक्त जाते. यामुळे रुग्णांना रक्ताची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासते. रक्ताच्या शोधात नातेवाईकांची फार तारांबळ उडते. तसेच रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची दमछाक होते. मात्र कधी कधी रक्त न मिळाल्याने अनेकांचे प्राणही गेले आहेत. याचा विचार सरकारने गांभीर्याने केल्याचे दिसले होते. मात्र ही योजनाच सुरू झाली नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंटतर्फे स्वच्छता,नागरिकांकडून अस्वच्छता

Amit Kulkarni

‘आयएनएस’च्या कार्यकारिणीपदी किरण ठाकूर यांची फेरनिवड

Archana Banage

एसएसएलसी परीक्षेबाबतचे चित्र अजूनही अस्पष्टच

Omkar B

आर्ट्स सर्कलतर्फे उद्या गायन मैफल

Omkar B

तिरुपती-कोल्हापूर रेल्वे काही दिवसांसाठी रद्द

Amit Kulkarni

आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांना मंत्रिपद द्यावे

Patil_p
error: Content is protected !!