असगणीच्या माळरानावर कोकाकोला प्रकल्प उभारणीला मुहूर्त ः 2 कि.मी. लांब संरक्षक भिंतीची उभारणी सुरू
प्रतिनिधी/ चिपळूण
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारित क्षेत्रातील असगणीच्या माळरानावर जगविख्यात कोकाकोला प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळाला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यूयॉर्क दौऱयात करार झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी प्रकल्प उभारणीसाठे आवश्यक बाबींची पूर्तता एमआयडीसीकडून पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी ताबा मिळालेल्या 47 एकर जागेभोवती सुमारे 2 कि.मी. लांब संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू झाले आहे. साधारणपणे हजार कोटीच्या दरम्यान गुंतवणूक असणाऱया या प्रकल्प उभारणीस डिसेंबरनंतरच प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अमेरिका दौऱयात कोकणच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱया शीतपेय बनवणाऱया जगविख्यात कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. सुमारे हजार कोटी रूपये गुंतवणुकीतून उभा राहणाऱया या प्रकल्पातून ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेयांचे उत्पादन होणार असून या प्रकल्पातून मोठय़ा संख्येने रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. राज्यातील हा चौथा प्रकल्प असल्याने कोकाकोला प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी यापूर्वी अनेकवेळा या औद्योगिक वसाहतीत येऊन परिसरातील हवा, पाणी, मातीचे नमुने घेतले होते.
मात्र प्रकल्प उभारणीला मुहूर्त मिळत नव्हता.
प्रकल्पाच्या दृष्टीने कोयनेचे अवजल, कोकण रेल्वे मार्ग, गरज पडलीच तर गुहागर अथवा दापोली हे जवळचे बंदर या गोष्टी महत्वपूर्ण असल्याने प्रकल्पाची येथे उभारणी निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर अचानकपणे या प्रकल्पाने लोटेतून बारामतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तेथे एमआयडीसीने त्याना 90 एकर जागा दिली. त्या जागेची शुल्क आकारणीही झाली. मात्र प्रकल्प उभारणीला सुरूवात झाली नव्हती. असे असतानाच कोरोनानंतर राज्य सरकारमध्ये औद्योगिक वातावरण काहीसे सकारात्मक झाल्यानंतर एमआयडीसीनेही कोकाकोला प्रकल्प उभारणीसाठीचे पर्याय दिले आणि त्यातूनच कोकाकोलाने पुन्हा लोटेकडे आपला मोर्चा वळवला. या प्रकल्पासाठी 100 एकर जागेची मागणी असताना सध्या एमआयडीसीने 47 एकरचा ताबा दिला असून अधिक जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे. सद्यस्थितीत प्रकल्प जागेतून ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्नही निकालात काढला गेला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या असगणी, लवेल, दाभिळ व सात्विनगाव परिसरातील 650 हेक्टर क्षेत्रासाठी अनेक उद्योगांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी कोकाकोला प्रकल्पासाठे पहिल्या टप्प्यात 8 फूट उंच आणि 2 कि. मी. लांब जांभा दगडाची भिंत उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. बेंगलोर येथील कंपनीकडून स्थानिक पोट ठेकेदारांमार्फत ते काम सुरू आहे.