प्रतिनिधी /काणकोण
नुवे, श्रीस्थळ येथील शेखर वेळीप (27 वर्षे) या युवकाचा मृतदेह कोर्नमळे, भाटपाल या ठिकाणी नदीत सापडला. मयत वेळीप हा युवक फ्लिपकार्ट कंपनीत कामाला होता आणि रविवार 18 पासून बेपत्ता होता. घरातून बाहेर पडताना आपल्या मामाच्या घरी जातो असे सांगून तो निघाला होता. मात्र त्याचा मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे वाडय़ावर संशयाचे वातावरण पसरले आहे.
मयत युवकाचा मृतदेह नदीत सापडला, तर त्याची स्कूटर भाटपाल येथे एका झाडाखाली सापडली आहे. त्या स्कूटरच्या चाव्या डिकीमध्ये सापडल्या. ज्यावेळी त्याचा मृतदेह सापडला त्यावेळी त्याच्या अंगावर शर्ट नव्हता. त्याच्या तोंडावर बऱयाच जखमा दिसून आलेल्या असून त्याचा मोबाईल पँटच्या खिशात सापडला आहे, अशी माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली.
त्याच्यापश्चात वडील आणि भाऊ असून वाडय़ावर एक सुस्वभावी युवक म्हणून तो परिचित होता, अशी माहिती सदर वाडय़ावरील थेवू वेळीप यांनी दिली. शेखर वेळीप याच्या मृत्यूविषयी वाडय़ावरील लोक संशय व्यक्त करत असल्यामुळे त्यादृष्टीने काणकोणच्या पोलिसांनी तपासकार्याला प्रारंभ केला आहे. निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास चालू असल्याची माहिती गावस यांनी दिली.
दरम्यान, दुमाणे-आगोंद येथील रस्त्यानजीक झाडीत एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवारी आढळला होता. मयत व्यक्तीचे वय साधारणपणे 30 ते 40 वर्षे इतके असून त्याने जीन पँट आणि टी-शर्ट परिधान केलेला होता. मृतदेहाच्या शेजारी टूथब्रश व टूथपेस्ट एवढय़ाच वस्तू सापडल्या होत्या. सदर मृतदेहाविषयी अद्याप कसलीच माहिती मिळालेली नाही. हा मृतदेह मडगावच्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती निरीक्षक गावस यांनी दिली.