आमदार जोशुआ डिसोझा यांची माहिती
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा तार नदीवर सुमारे 9 कोटी खर्चून नव्याने बांधण्यात येणाऱया पुलाचे काम पूर्णत्वाकडे आले असून या महिन्याच्या शेवटच्या दिवशी 30 मे ला या पुलाचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पाऊस पडल्याने कामास थोडा उशीर झाला. हा रस्ता डोंबरीकरण करण्यास अन्य 3 दिवस लागेल. ते पूर्ण झाल्यावर आम्ही या पुलाचे उद्घाटन करू शकतो. काही प्लास्टर पेंटिंग करण्याचे काम बाकी आहे. कंत्राटदारांनी तसेच जीआयडीसी व मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करणार असे आश्वासन जनतेला दिले होते ते काम पूर्णत्वाकडे आले असल्याचे आमदार डिसोझा म्हणाले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य मनिषा नाईक, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, नगरसेवक साईनाथ राऊळ, बस्तोडा सरपंच रणजीत उजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या नदीच्या पात्रात झाडे वाढली आहेत शिवाय येथे तात्पुरता पाणी बुझवून पूल तयार केला होता तो पावसाळय़ापूर्वी साफ करण्यात येईल व सर्व गाळ उपसून नदी पुन्हा सुरळीत होईल असे ते म्हणाले.