जिल्हा परिषदेच्या सर्व जागांची होणार मोजणी, फाईव्ह स्टार आरोग्य केंद्रे करण्यासाठी तरतूद
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे 2022-23 या वित्तीय वर्षाचे व अंतिम सुधारित 2023-24 या वित्तीय वर्षाचे मुळ अंदाजपत्रक अपेक्षित 50 कोटी रुपये विचारात घेऊन 49.99 कोटी रुपयांचे प्रशासकीय सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी मांडले. त्यास प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी देण्यात आली. शिक्षण आणि आरोग्य या दोन विभागांना ज्यादाची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद वीजेच्या बाबतीत बचत करण्यासाठी सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तरतूद केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील एक फाईव्हस्टार पीएएसी करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांची मोजणी करुन नकाशे अद्यावत करण्यासाठी खास 50 लाखांची तरतुद करण्यात आली आहे.
मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये 2022-23 या वित्तीय वर्षातील एप्रिल 2022 ते दि. 10 मार्च 2023 अखेर प्राप्त झालेल्या रक्कमा विचारात घेऊन 2022-23 चे 90 कोटी रुपयांचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे मुळ अंदाजपत्रकात एकूण अपेक्षित महसूली उत्पन्न 50 कोटी इतके गृहीत धरण्यात आले असून त्यापैकी 49.99 कोटी महसुली खर्चाचे अंदाजपत्रक सर्व विभागांचा समतोल राखून प्रस्तावित केले आहे. मुळ अंदाजपत्रक हे 1 लाख रुपये शिल्लकेचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी सांगितले.