प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा कौटुंबीक न्यायालयासाठी नूतन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन शनिवार दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात ही इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना बी. वर्ले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व बेळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय न्यायाधीश बी. विराप्पा राहणार आहेत.
दोन कौटुंबीक न्यायालये सुरू करण्यासाठी इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये मुख्य कौटुंबीक न्यायालय व पहिले अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय सुरू केले जाणार आहे. कौटुंबीक वादातील खटल्यामध्ये वाढ झाल्याने दोन न्यायालये सुरू करणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. हेमलेखा, न्यायाधीश अनिल बी. कट्टी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे व्हा. चेअरमन विनय बी. मांगलेकर उपस्थित असतील. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्ताफा हुसेन एस. ए., बार असोसिएशनचे अध्यक्ष
अॅड. प्रभू यत्नट्टी, जनरल सेक्रेटरी जी. एन. पाटील, सार्वजानिक बांधकाम खात्याचे अभियंते एस. एस. सोबरद यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमासाठी इमारतीसमोर भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.