ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भरधाव वेगातील PMPML बस स्पीड ब्रेकरवर आदळल्याने बसमधील महिला प्रवाशाचे तीन मणके मोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बस चालक अक्षय दुबे (32) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजुम मुनावर सिद्धकी (44) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धकी आणि त्यांची बहीण सायरा (48) या दोघी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास वानवडी भागात PMPML बसने प्रवास करत होत्या. ही बस गिरमे शाळेसमोर आली असता बस चालकाने जोरात बेक दाबला आणि बस स्पीड ब्रेकरवर आदळली. या हादऱयामुळे बसमधील महिला प्रवासी सिद्धकी यांच्या पाठीला मार लागला. त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवले असता त्यांच्या पाठीचे 3 मणके फ्रॅक्चर असल्याचे समजले. उपचारानंतर आता सिद्धकी यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली असून, बसचालक दुबेवर भारतीय दंडात्मक कलम 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.