/विकासकामांसह नवीन प्लॅटफॉर्म उभारणार : बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आल्याने मागील चार-पाच वर्षांपासून तात्पुरत्या बसस्थानकातून बस वाहतूक सुरू होती. मात्र आता तात्पुरते बसस्थानक हटवून त्या ठिकाणी विकासकामे राबविली जाणार आहेत. दरम्यान, तात्पुरत्या बसस्थानकात थांबणाऱया बस इतरत्र स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट बसस्थानकाचा तब्बल 34 कोटींतून विकास साधला जात आहे. बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्लॅटफॉर्म आणि इतर कामे हाती घेतली जाणार असून तात्पुरत्या स्वरुपात असलेले बसस्थानक हटवून नवीन प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी जुने बसस्थानक हटविण्यात आले होते. दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या एका बाजूला तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी केली होती. या ठिकाणांहून स्थानिक आणि लांबपल्ल्याची बस वाहतूक सुरू होती. मात्र आता तात्पुरत्या बसस्थानकाचे कामदेखील हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे तात्पुरते बसस्थानक इतरत्र हलविले आहे.
दोन्ही बाजूंना प्रवेशद्वारे
तात्पुरते बसस्थानक हटवून येथील बसेसची सोय बसस्थानकाच्या आवारातच पश्चिमेकडे केली आहे. नवीन प्लॅटफॉर्म उभारून याठिकाणी बस थांबविल्या जात आहेत. मात्र अद्याप बऱयाच प्रवाशांना बसस्थानक स्थलांतरित केलेली माहिती नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. स्मार्ट बसस्थानकात विविध सोयी-सुविधा केल्या जात आहेत. नवीन इमारतीबरोबर सुसज्ज असे प्लॅटफॉर्म उभारले जात आहे. तसेच प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रवेशद्वारे खुली केली जात आहेत.