पुणे / प्रतिनिधी :
चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुका लढवण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकांना दोन वर्षांचा कालावधी उरलेला असताना आता या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर या दोन्ही मतदारसंधातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत पवार यांनी साशंकता व्यक्त केली.
अधिक वाचा : महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ, एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे लढण्यास इच्छुक असून त्याबाबतचा निर्णय भाजप घेईल. त्यात आम्ही नाक खुपसणे गरजेचे नाही. परंतु आता पुण्यातील या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला असल्यामुळे या निवडणुका बिनविरोध होतील की नाही, याबाबत मला शंका आहे. अर्थात चर्चेनंतरच भूमिका ठरवू, असे सांगतानाच भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार असून कसब्याबाबतही काही मंडळींची भेट घेणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.