Tarun Bharat

अखेर विस्तारले मंत्रिमंडळ

Advertisements

केसरकर, सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपद

प्रतिनिधी/ मुंबई

तब्बल 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ विस्तारले आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 अशा 18 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि मंत्रिमंडळाची अस्थिरता अखेर संपुष्टात आली आहे. तथापि या मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीचे ग्रहण लागल्याचे दिसून आले आहे. संजय शिरसाट आणि शिंदे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे वृत्त आहे. तर वादग्रस्त संजय राठोड, अब्दुल सत्तार यांचाही समावेश केल्याने तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहे. याशिवाय एकाही महिला नेत्याला या विस्तारात स्थान न दिल्यानेही सरकारवर टीका होऊ लागली आहे. त्याचबरोबर या टप्प्यामध्ये एकाही अपक्ष आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही. तथापि दुसऱया टप्प्यामध्ये यासह अन्य काही नाराजांना संधी मिळू शकते.

दोन्ही गटातील प्रत्येक 9जण

 शिंदे-फडणवीस यांच्या 18 शिलेदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्य तसेच विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिंदे गटातील तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, डॉ. विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली. या मंत्र्यांना लवकरच खातेवाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे कोणीही नाराज नाही, अधिवेशनानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून त्यावेळी आणखी काहीजणांना संधी मिळेल, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भाजपचे लक्ष्य 2024

दरम्यान, भाजपने सत्ता स्थापन करतानाच 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेचे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभेला 545 पैकी 400 जागा जिंकण्याचे लक्ष असून यामध्ये महाराष्ट्रातील 16 जागांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तार करतानाही तेच लक्ष्य ठेवल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभेला 200 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत बारामती, सातारा, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह अन्य जागांचा समावेश आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळातील सदस्यांना स्थान दिल्याचे राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे.

महिला सदस्य नाहीत

या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिला सदस्याला संधी देण्यात आलेली नाही. महिलांना संधी नाकारण्यात आल्याने शिंदे सरकारवर मोठय़ा प्रमाणात टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा दाखला देत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना ही बाब अतिशय खेदजनक आहे. राज्यातील स्त्राr शक्तीचा हा अपमान असल्याचे म्हटले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी हे महिला सक्षमीकरणासाठी आग्रही असतात. त्या केवळ होममेकर असू नयेत, नेशन बिल्डर असाव्यात, असे वारंवार म्हणत असतात. परंतु राज्यात मात्र त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी महिलांना प्रतिनिधीत्व का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राठोडांच्या समावेशाने तीव्र नाराजी

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणानंतर मविआ मंत्रिमंडळातून वगळलेल्या संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने सरकारवर प्रचंड टीका होत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीच राठोड यांच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला असला तरीही आपला लढा थांबणार नाही. त्या प्रकरणाचा तडा लावण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही वाघ यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय अनेक महिला नेत्या, सामजिक कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांना टाळले असते तर बरे झाले असते ः अजित पवार

ज्या नेत्यांवर आरोप झाले, ज्यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही अशांना टाळले असते तर बरे झाले असते, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. तथापि उशिरा का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळाले आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. आता लवकरात लवकर महाराष्ट्रातील प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

….म्हणून राठोड यांना स्थान ः एकनाथ शिंदे

संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचे काही म्हणणे असेल तर ते ऐकून घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चौकशी सुरु असताना त्यांनी राजीनामा दिला होता. आता कोणी म्हणते म्हणून त्यांना दोषी ठरवायचे काय? असा प्रश्नही शिंदे यांनी केला आहे.

विरोधकांनी आरशात पहावे ः देवेंद्र फडणवीस

संजय राठोड, अब्दुल सत्तार यांचा समवेश आणि महिलांना संधी नाकारल्याने सरकावर टीकेची झोड उठत आहे. तथापि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना फटकारले आहे. टीका करणाऱया विरोधकांनी आधी स्वतःला आरशात पहावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ज्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जेलमध्ये आहेत, अनेक नेत्यांवर खटले सुरु आहेत, त्यांना असे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी आधी आरसा पहावा आणि मग टीका करावी. त्याकरता अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

का रखडला विस्तार ?

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर ठाकरे गटाने व्हीप बजावल्याने 16 आमदारांवर अपात्रतेची तलावर होती. याप्रकरणी शिंदे गटाने आणि ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने तेथे याचिका प्रलंबीत आहेत. त्यांची सुनावणी जशी पुढे ढकलली गेली तसाच विस्तारही पुढे गेला. त्याचबरोबर कोणाला किती मंत्रीपदे, विस्ताराबाबत एकवाक्यता नसणे हीसुद्धा कारणे आहेत. तथापि टीका वाढू लागल्याने दोघांनीही वारंवार दिल्ली वाऱया करुन विस्ताराची परवानगी पदरात पाडून घेतली.

Related Stories

वऱ्हाड घेऊन जाणारी कार नदीत कोसळली; नवरदेवासह 9 ठार

Sumit Tambekar

तालिबानचा उल्लेख, अन् देशाला धमकी

Patil_p

दिल्लीतील न्यायालयांचे दैनंदिन कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित

Rohan_P

पासवान यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Patil_p

हत्येच्या आरोपात हत्तिण अन् तिच्या पिल्लाला पकडले

Patil_p

योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Rohan_P
error: Content is protected !!