कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांनी घेतली बेंगळूरच्या वरिष्ट अधिकाऱयांची भेट
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने पथदीपांच्या विद्युतबिलाची रक्कम भरली नसल्याने हेस्कॉमने पथदीपांचा वीजपुरवठा खंडित केला होता. याबाबत कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांनी राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन कॅन्टोन्मेंटच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला कॅन्टोन्मेंट परिसर पुन्हा उजळला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डला कर्नाटक व केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. मात्र मागील पाच वर्षांपासून केंद्राने अनुदान देण्याचे बंद केले आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डने हेस्कॉमची पथदीपांच्या बिलाची रक्कम भरली नव्हती. तसेच राज्य शासनाकडून एसएफसी अनुदान देण्याचेही 2011 पासून बंद केले होते. त्यामुळे पथदीपांच्या विद्युत बिलाची रक्कम थकली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हेस्कॉमचे 4 कोटी रुपये देणे आहे. त्यामुळे दसरा झाल्यानंतर लागलीच हेस्कॉमने कॅन्टोन्मेंटच्या पथदीपांचा विद्युतपुरवठा बंद केला होता. परिणामी कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. याचदरम्यान मिलिटरीचा पुनर्मिलन मेळावा आयोजिला होता. त्यामुळे पथदीप सुरू करण्याची सूचना केली होती. कार्यक्रमासाठी केवळ दोन दिवस पथदीप सुरू केले. मात्र पुन्हा बंद केल्याने दिवाळी सणाच्या तोंडावर कॅन्टोन्मेंट परिसरात अंधाराच्या विळख्यात सापडला होता.
पथदीप सुरू ठेवावेत, याकरिता हेस्कॉमच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. पण आधी विद्युत बिलाची रक्कम भरा, अशी सूचना केली. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद व कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर यांनी बेंगळूर येथे मुख्य सचिव कुमार नायक यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंटच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले.
विनंतीची घेतली दखल
शासनाकडून मिळणाऱया अनुदानांतर्गत बिलाची रक्कम भरली जाईल, याकरिता बिलाची रक्कम भरण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली. सध्या कॅन्टोन्मेंट परिसरात अंधार पसरला असून, सणाच्या पार्श्वभूमीवर पथदीप सुरू करण्यात यावेत, याकरिता आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून केली. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला सुरू केले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसर पुन्हा उजळला आहे. अन्यथा अंधारातच दिवाळी साजरी करण्याची वेळ आली होती.