प्रतिनिधी /वास्को
वास्को चिखली महामार्गावरील गोवा शिपयार्डसमोरील साकवावर टोयोटा कार अपघातात सापडण्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. कारमध्ये दोघां महिलांसह एक मुलगा होता. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या.
हा अपघात सोमवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास घडला. वास्को शहरातून चिखलीच्या दिशेने जाणारी टोयोटा कार गोवा शिपयार्डसमोरील साकवावर पोहोचताच साकवाच्या कठडय़ाला लागून असलेल्या दगडाला आपटून उलटली. साकवाचा कठडा तुटला असता तर ही कार थेट नाल्यात कोसळली असती. कार रस्त्यावर उलटताच जवळच असलेल्या लोकांनी धावत जाऊन कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. ही कार महिला चालवत होती. अन्य एक महिला व एक 12 वर्षांचा मुलगा या कारमध्ये होता. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली. वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनाम केला आहे. चालक महिलेला डोळा लागल्याने ही घटना घडल्याची चर्चा अपघात स्थळी होती.