Tarun Bharat

वाचा सविस्तर, सीबीआयने २ दिवस अगोदरच ठोकला तळ

Advertisements

कोल्हापूर/प्रतिनिधी

सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभाग) पथकाने जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील सेंट्रल जीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग) विभागाच्या कार्यालयातील दोन बडय़ा अधिकाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडले. जीएसटी विभागाचे अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा अशी अटक केलेल्या अधिकाऱयांची नावे आहेत. सीबीआयच्या पथकाने कमालीची गुप्तता पाळत गुरूवारी (दि. २८) ही कारवाई केली. शुक्रवारी या कारवाईची अधिकृत माहिती सीबीआयच्या नवी दिल्लीतील प्रधान कार्यालयाने जाहीर केली. हि कारवाई करण्यासाठी पुण्यातील सीबीआयव्हा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच जयसिंगपुरात तळ ठोकला होता. त्याबाबत कमालीची गुप्तता देखील पाळली होती.

जिल्हय़ातील एका व्यापाऱयाकडून सेवा कर दायीत्वाबद्दल प्रकरण निकालात काढण्यासाठी या दोन्ही अधिकाऱयांनी ७५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान, संबंधित व्यापाऱयाने सीबीआयकडे तक्रार केली होती. पन्नास हजार देण्यावर तडजोड झाल्यानंतर ते स्वीकारत असताना दोन्ही अधिकाऱयांना सीबीआयने अटक केली. दरम्यान, या कारवाईच्या वृत्तानंतर कोल्हापूर, सांगली जिल्हय़ासह राज्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात सीबीआयकडून देण्यात आलेली माहिती अशी २०१७-१८ आणि २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षातील जीएसटीच्या दायित्वासंदर्भातील प्रकरण निकालात काढण्यासाठी जिल्हय़ातील एका तक्रारदार व्यापाऱयांकडून जयसिंगपूर येथील सेंट्रल जीएसटीच्या कार्यालयातील जीएसटी विभागाचे अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा ७५ हजार रूपयांची मागणी केली होती. ५० हजार रूपये देवून प्रकरण निकालात काढण्यावर तडजोड झाली. दरम्यान, संबंधित तक्रारदाराने सीबीआयकडे या प्रकरणाची माहिती देवून तक्रार केली. तसेच तडजोडीच्या रकमेसंदर्भातही माहिती दिली होती. तक्रारीनंतर सीबीआयचे पथकाने शुक्रवारी नियोजनबद्ध सापळा लावला. जयसिंगपूर येथील सेंट्रल जीएसटीच्या कार्यालयाबाहेर ५० हजारांची लाच स्वीकारत असताना नेसरीकर आणि मिश्रा यांना रंगहात पकडण्यात आले. या दोघांनाही अटक केल्यानंतर जयसिंगपूरच्या विशेष न्यायालयातील न्यायाधिशांपुढे हजर करण्यात आले.

जयसिंगपूर, कोल्हापूरच्या निवासस्थानी तपासणी, महत्वाची कागदपत्रे हस्तगत
अटक केलेल्या नेसरीकर आणि मिश्रा यांच्या जयसिंगपूर आणि कोल्हापूर येथील निवासस्थानांची सीबीआयच्या पथकातील अधिकाऱयांनी तपासणी केली. या तपासणीत सीबीआयच्या पथकाला महत्वाची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआयकडून कारवाईत कमालीची गुप्तता
तक्रारदाराने सीबीआयच्या नवी दिल्लीतील लोधी मार्गावरील प्रधान कार्यालयात जयसिंगपूरच्या सेंट्रल जीएसटी कार्यालयातील दोन्ही अधिकाऱयांविरोधात लाच प्रकरणी तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱयांचे पथक दोन, तीन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर या पथकाने गुरूवारी (28 एप्रिल) जयसिंगपूरमध्ये सापळा लावून कारवाई केली. या प्रकरणाची स्थानिक पोलीस अथवा न्यायालयातील सरकारी वकिलांनाही कल्पना देण्यात आली नाही. शुक्रवारी सीबीआयने अधिकृत पत्रक काढत कारवाईची माहिती जाहीर केली.

जयसिंगपूरचे कार्यालय प्रथमच चर्चेत
व्यापारी, उद्योजकांशी संबंधित असणाऱया जीएसटी विभागाचा सर्व सामान्यांशी फारसा संबंध नसतो. तयामुळे या विभागाची आणि कार्यालयाची फारशी चर्चा होत नसते. पण करदायित्व प्रकरण निकालात काढण्यासाठी केलेल्या लाचेच्या मागणीच्या प्रकरणामुळे जयसिंगपूरचे सेंट्रल जीएसटीचे कार्यालय प्रथमच चर्चेत आले आहे.

राष्ट्रीय पातळीवर कारवाईची चर्चा
सीबीआयने जयसिंगपूरमध्ये सेंट्रल जीएसटीच्या कार्यालयात केलेल्या कारवाईची चर्चा राष्ट्रीयस्तरावर झाली. सीबीआयने अधिकृत माहिती जारी केल्यानंतर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही बातमीची दखल घेतली. सीबीआयची कारवाई असल्याने जयसिंगपूरची कारवाई नॅशनल न्यूज झाली.

कोल्हापुरात प्रथमच सीबीआयची कारवाई
सीबीआयच्या पथकाकडून कोल्हापूर जिल्हय़ात झालेली ही पहिली कारवाई असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

जिल्हय़ातील सेंट्रल जीएसटीच्या कार्यालयही अनभिज्ञ
कोल्हापूर शहरात सेंट्रल जीएसटीची तीन कार्यालये आहेत. त्याचबरोबर जयसिंगपूरमध्ये कार्यालय आहे. लाच प्रकरणी दोन अधिकाऱयांवर झालेल्या कारवाईबाबत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ होते. कारवाईबाबत काही अधिकाऱयांकडे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.

कारवाई कुणाची ? …सीबीआयची की एसीबीची ?
सेंट्रल जीएसटीच्या जयसिंगपूर कार्यालयात दोन अधिकारी लाच घेताना सापडले. ही कारवाई नेमकी सीबीआयने की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली याबद्दल चर्चा होती. सेंट्रल जीएसटी की स्टेट जीएसटी कार्यालय यावरही चर्चा होती. सीबीआय कसे कारवाई करेल? असेही काही जण म्हणत होते. पण नंतर सीबीआयने कारवाई केल्याचे समजल्यानंतर लाचेचे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गेल्याचे स्पष्ट झाले.

error: Content is protected !!