केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचा विश्वास : मुरगावच्या रोजगार मेळाव्यात 65 जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे
प्रतिनिधी /वास्को
वर्षभरात देशातील दहा लाख युवा-युवतींना रोजगार देण्याचे वचन केंद्र सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुरगाव हेडलॅण्ड सडा येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात व्यक्त केला. या मेळाव्यात 65 बेरोजगारांना नोकरीची नियुक्तपत्रे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
हेडलॅण्सडा येथील दीपविहार हायस्कुलच्या आवारात या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने पुढाकार घेतला होता. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
देशातील युवावर्गाला वर्षभरात दहा लाख नोकऱया उपलब्ध करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. या आश्वासनाचे पालन म्हणून काल सोमवारी देशभरात रोजगार मेळावे भरवून पहिल्याच टप्प्यात 75 हजार नोकऱयांचे वाटप करण्यात आले आहे. याचा देशव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून गोव्यातील मुरगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय श्रीपाद नाईक यांच्या हस्ते 65 जणांना नोकरीच्या नियुक्तीची पत्रे देण्यात आली. यात 99 टक्के नोकऱया केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामधील आहेत. नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील युवकांबरोबरच काही गोव्यातील युवकांचाही समावेश आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित युवक युवतींना ऑनलाईन माध्यमाव्दारे मार्गदर्शन केले.
मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात दहा लाख नोकऱया देण्याच्या केलेल्या घोषणेबाबत माहिती देताना केंद्र सरकार हे वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले. दर महिन्याला असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येतील व युवकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात येतील, असे श्री. नाईक म्हणाले.
जागतिक आयुर्वेदा काँग्रेसमध्ये पंतप्रधान सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात यंदा डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आयुर्वेदा काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारी आयुर्वेदा काँग्रेस यंदा गोव्यात होत असल्याने पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्यात आलेले आहे. मोपा येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेदा सज्ज झालेले असून या हॉस्पिटलचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करू शकतात. शिवाय उड्डाणासाठी सज्ज झालेला मोपाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाहतुकीसाठी खुला करण्यात येणाऱया झुआरी नदीवरील एका बाजूचा पूल पंतप्रधानांच्या हस्ते खुला करण्यात येईल. पंतप्रधानांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र, ते आपल्या गोवा भेटीत या प्रकल्पांचे उद्घाटन करतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.