Tarun Bharat

भारतासमोर क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान

बांगलादेशविरुद्ध शेवटची वनडे लढत आज, भारताला जखमी खेळाडूंची समस्या

वृत्तसंस्था/ चत्तोग्राम

मैदानावर झालेल्या दुखापती आणि खेळाडूंच्या फिटनेसबाबतच्या समस्या यांनी हैराण झाल्याने काहीसा कमकुवत झालेल्या भारतीय संघाची बांगलादेशविरुद्ध तिसरी व शेवटची वनडे लढत शनिवारी येथे होत असून भारतीय संघाला क्लीन स्वीप टाळण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सकाळी 11.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

पहिले दोन सामने निसटत्या फरकाने जिंकत बांगलादेशने ही मालिका याआधीच जिंकली असल्याने या सामन्याला औपचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात गोलंदाज मेहदी हसन मिराजची फलंदाजी जास्त निर्णायक ठरली होती. त्यामुळे ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसे झाल्यास त्यांच्यासाठी हे भारताविरुद्धचे पहिले ऐतिहासिक यश ठरेल. याने बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावेलच, पण कसोटी मालिकेआधी भारतीय संघाच्या आत्मविश्वासालाही तडा जाऊ शकतो. 14 डिसेंबरपासून याच मैदानावर पहिली कसोटी होणार आहे.

या मालिकेसाठी सुरुवातीला भारताकडे 20 खेळाडू उपलब्ध होते. कारण येथील पहिला वनडे सामना व न्यूझीलंडमधील शेवटचा सामना यात फारच कमी अवधी होता आणि दोन्ही ठिकाणी संघातील काही खेळाडू सहभागी झाले होते. पण दुर्दैव असे की एका आठवडय़ातच परिस्थिती वाईटवरून अतिवाईट बनली असून या शेवटच्या सामन्यासाठी फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुसऱया सामन्यात हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली असून तो उपचारासाठी मायदेशी परतला आहे. नवोदित वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना पाठीला दुखापत झाली आहे तर दीपक चहर हा दुखापतप्रवण खेळाडू पुनरागमनानंतरच्या प्रत्येक मालिकेत जखमी होत आला आहे. याशिवाय अक्षर पटेलच्या बरगडीला मार बसल्याने तोही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता तर न्यूझीलंडहून थेट बांगलादेशमध्ये दाखल झालेल्या पंतलाही आधीपासूनच दुखापत असल्याने त्याच्यावरील ताण टाळण्यासाठी त्याला या मालिकेतून वगळण्यात आले.

India’s Mohammed Siraj celebrates the wicket of Bangladesh’s Anamul Haque during the second one day international cricket match between Bangladesh and India in Dhaka, Bangladesh, Wednesday, Dec. 7, 2022. (AP/PTI)(AP12_07_2022_000087B)

रोहित व चहर उपलब्ध नसल्याने संघात दोन बदल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इशान किशनला सलामीवीर म्हणून अंतिम संघात घेतात की, या फॉरमॅटमध्ये मध्यफळीत खेळत असलेला केएल राहुल स्वतःला बढती देत सलामीला येतो, हे पहावे लागेल. दक्षिण आफ्रिका दौऱयात तो सलामीलाच खेळला होता. विराट कोहली-शिखर धवन हा दुसरा पर्याय पुढेही चालू ठेवत राहुल त्रिपाठीला संधी देण्याचाही विचार होऊ शकतो. त्रिपाठी गोलंदाजीही करू शकतो. संघव्यवस्थापनाने उपयुक्त खेळाडूऐवजी निव्वळ फलंदाज घेण्याचे ठरविल्यास स्टायलिश फलंदाज रजत पाटीदारला संधी मिळू शकते.

चहरसाठी एकही बॅकअप गोलंदाज तसेच दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने अष्टपैलू शाहबाज अहमदला घेतले जाऊ शकते. गोलंदाजीचा तो सहावा पर्याय असेल. सिराज, शार्दुल, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल हे भारतीय आक्रमणाचे प्रमुख गोलंदाज असतील. बुमराह, शमी, जडेजा यांच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजी अखेरच्या टप्प्यात प्रभावहीन झाली आहे. पहिल्या सामन्यात 51 धावांची गरज असताना भारताला त्यांचा शेवटचा गडी बाद करता आला नाही तर दुसऱया सामन्यात 6 बाद 69 अशा स्थितीनंतरही बांगलादेशने 250 हून अधिक धावांची मजल मारली. या सामन्यात चहरला झालेली धोंडशिरेची दुखापतही बांगलादेशच्या पथ्यावर पडली होती.

शेवटच्या सामन्यात बांगलादेशला फेव्हरिट मानले जात असून कर्णधार केएल राहुलसमोर दुसऱयांदा क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्याचे आव्हान असेल. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने मालिका जिंकली असली तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला असा पराभव स्वीकारावा लागला होता. केएल राहुलकडे दीर्घकालीन कर्णधार म्हणून पाहिले जात आहे का, याचा मात्र अद्याप पुरेसा अंदाज आलेला नाही. चहर व कुलदीप सेन खेळणार नसल्याने निवड समितीने कुलदीप यादवला संघात सामील केले आहे.

संभाव्य संघ ः भारत ः केएल राहुल (कर्णधार), धवन, कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सिराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक.

बांगलादेश ः लिटॉन दास (कर्णधार), अनामुल हक, शकीब अल हसन, मुश्फिकूर रहीम, अफिफ हुसेन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद, हसन मेहमूद, इबादत हुसेन चौधरी, नसुम अहमद, मेहमुदुल्लाह, नजमुल हुसेन शांतो, काझी हसन सोहन, शोरिफुल इस्लाम.

सामन्याची वेळ ः सकाळी 11.30 पासून

थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.

Related Stories

ऑलिम्पियन मुष्टियोद्धय़ांची राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधून माघार

Patil_p

धोनी वनडेतून लवकरच निवृत्त होईल

Patil_p

लक्ष्य सेनचे आव्हान समाप्त

Patil_p

विश्वनाथ, वंशज उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सानिया मिर्झाची टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

datta jadhav

सेहवाग म्हणतो चार दिन की चाँदनी होती है, टेस्ट क्रिकेट नही!

Patil_p