Tarun Bharat

शाहूवाडीत शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान, बंडखोरीचे लोण थोपवण्यासाठी सज्जता

शाहूवाडी/ संतोष कुंभार

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचे लोण हातकणंगले लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचले. खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाची वाट धरली असली तरी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यासह शिवसैनिकांसमोर शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान उभे आहे. सद्यस्थितीत शिवसैनिक खंबीरपणे शिवधनुष्य पेलत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी उभे असल्याचे चित्र आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी ‘कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ‘मातोश्री’बरोबर एकनिष्ठ राहणार’ असल्याचेही स्पष्ट केले आहे.

राज्याच्या राजकारणात मोठय़ा घडामोडीनंतर शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातही चर्चेला उधाण आले होते. बंडखोरीचे लोण मतदारसंघापर्यंत पोहोचणार नाही, अशी स्थिती होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेचे प्रवक्ते असल्याने ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसोबतच राहणार, अशी अपेक्षा शिवसैनिकांसह सर्वसामान्य मतदारांत होती. मात्र राज्यातील अन् शिवसेनेतील राजकीय घडामोडीत खासदार माने यांनी शिंदे गटाची वाट धरली अन् शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले, सोशल मीडियातून याबद्दल तीव्र भावना व्यक्त झाल्या.

गत लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटाने शिवधनुष्य पेलत खासदार मानेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. दरम्यान, राजकीय घडामोडीत मात्र शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच आम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी देखील आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा शिवसैनिक नव्या जोमाने बंडखोरीचे लोण थोपवण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटाचेच प्राबल्य अधिक आहे. तरीही कोणाच्या गळ्यात विजयाचा हार आणि कुणावर विजयाचा गुलाल उधळायचा, याच्या गोळाबेरजेत मतदारसंघातील मतदानही तितकेच महत्त्वपूर्ण ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुळातच शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेना-भाजप युती झाली असली तरीदेखील म्हणावे तितके मनोमिलन दिसत नव्हते, याचे प्रत्यंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळेच अंतर्गत खदखदही आहे. त्यातच आता भाजपचे घटक पक्ष म्हणून जनसुराज्यशक्ती
पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे यांची भाजपशी असलेली जवळीळ आणि त्यातच आता खासदार माने यांनी शिंदे गटाची धरलेली वाट यामुळे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवधनुष्य सक्षमपणे पेलण्यासाठी शिवसैनिकांना कंबर कसावी लागणार आहे. आगामी सर्वच निवडणुकांत त्यांचा कस लागणार आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली राज्यातील आघाडी तालुक्यात एक होणार की सोयीनुसार गटात विभागणी होणार, यावरच विधानसभा मतदारसंघाची रणनीती ठरणार आहे.

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात दाखल झालेले खासदार धैर्यशील माने हे आपली नवी राजकीय एन्ट्री शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात कशा पद्धतीने करतात, आणि त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेले माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर आणि शिवसैनिक कशा पद्धतीने या बंडखोरीला थोपवतात, याकडेच आता सर्वांची उत्सुकता लागली आहे. त्याचे पडसाद आगामी ‘मलकापूर नगर परिषद’ तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : अकाऊंट हॅक, 29 लाखांची फसवणूक

Archana Banage

Sambhajiraje Chhatrapati : अजून किती वर्षे आंदोलन करायची…2024 हे लक्ष्य- संभाजीराजे

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : मुद्रांक शुल्कातून दिलासा, रेडिरेकनचा दणका

Archana Banage

कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने गांभीर्य घेतले पाहिजे

Archana Banage

शिरोळ शहर पुन्हा चार दिवस बंद नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी प्रशासन हतबल

Archana Banage

सांगलीतील व्यापाऱ्याचे ८० लाख लुटले

Archana Banage