Tarun Bharat

राज्यशकट चालवण्याचे आव्हान!

Advertisements

साधारणपणे 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 18 कॅबिनेट मंत्र्यांची नावे घोषित झाली. ज्या गतीने आणि अडथळय़ांना तोंड देत या सरकारची सुरूवात झाली आहे, ती पाहता येणारा काळ त्यांच्यासाठी आणखी खडतर असेल. एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसरीकडे जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे सरकार अवैध असल्याचे म्हटले आहे, कारण शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट फुटून सत्तेत सहभागी झाला आहे. खरी शिवसेना कोणती हे न्यायालयात सिद्ध होईल. मात्र, आम्हीच खरे शिवसैनिक आहोत आणि भाजप-शिवसेना युतीचेच सरकार आता स्थापन झाल्याचा दावा एकनाथ शिंदे करीत आहेत. 2019च्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युतीलाच बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले होते, पण उद्धव ठाकरे यांना भरीस पाडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अडीच वर्षांचा सत्तेचा सारीपाट मांडला. त्यामुळे त्यांच्या अनेक ऐतिहासिक कारवायांमध्ये आणखी एक भर पडली. राजकारणाचे अंतिम ध्येय सत्ताग्रहण करणे हेच असते, पवारांनी ते अनेकदा गाठले आहे. या पार्श्वभूमीवर अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यात नऊ भाजपचे आणि नऊ शिवसेनेचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे गटाविरुद्ध गेला तर आणखी पेच निर्माण होईल. आज मंगळवारी मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून ज्यांची नावे जाहीर झाली आहेत, त्यातील अनेकजण आधीच्या मंत्रिमंडळात होतेच. इतकेच नव्हे तर काहीजण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही होते. राधाकृष्ण विखेपाटील किंवा विजयकुमार गावित अशी नावे सांगता येतील. दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड, उदय सामंत, अब्दुल सत्तार ही नावेदेखील त्यांच्या उत्तम काम करण्याच्या वकुबामुळे नव्हे तर अन्य गोष्टींमुळे बहुचर्चित आहेत. केसरकर, राठोडांचा प्रवासही काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे झाला आहे. उदय सामंतांसारखी अशी आणखीही उदाहरणे सांगता येतील. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आपण मंत्रिपदी कायम राहायचे हे कसब या मंडळींनी चांगले साधले आहे. केवळ पद आणि सत्तेसाठी पक्षनि÷sला तिलांजली देणारी माणसे पुनःपुन्हा मंत्री होतात, हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांना मंत्रिमंडळात मिळालेले स्थान ही कुप्रथा आहे. राठोड यांना ‘क्लिनचिट’ मिळाल्याचे सांगत पाठीशी घातले जात आहे. यापूर्वीच्या मंत्रिपदाच्या कालखंडात त्यांनी लक्षणीय कामगिरी करुन दाखवलेली नव्हती, उलट भलते वाद ओढवून घेतले. भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या मंत्रीपदाला आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्याविरुद्धची लढाई जारी ठेवू असे जाहीर केले आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी राठोड यांचे नुसते अभिनंदनच केले आहे असे नाही, तर त्यांच्यावर आरोप झाले तेव्हा ते व त्यांचे कुटुंबीय कोणत्या मनस्थितीतून गेले असतील, याची कल्पनाच करवत नाही, अशा आशयाचे विधान करून त्यांचे समर्थन केले आहे. त्याचवेळी जिच्यावर राठोडांनी अन्याय केला आहे, असे म्हटले जाते ती पूजा महाराष्ट्राची कन्या आहे, तिला न्याय मिळवून देऊ असे सांगितले आहे. राजकारणाची ही कोणती पातळी आहे हे कळण्यास प्रत्यवाय नाही. भाजप-शिवसेनेच्या मागच्या सत्तेच्या काळात चमकदार कामगिरी केलेले कोण मंत्री आहेत हे तपासणे अगत्याचे आहे. स्वतः फडणवीस वगळले तर इतरांचा ‘परफॉर्मन्स’ उल्लेखनीय नव्हता. भाजपच्या त्याच नेत्यांना पुन्हा स्थान मिळाले आहे. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना मंत्री केल्याने ते पद कदाचित आशिष शेलारांकडे जाऊ शकते. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवायच्या हा प्रश्नच आहे. अतुल सावे, संदिपान भुमरे, सुरेश खाडे यांच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगावे? वर्षानुवर्षे मागास असलेल्या मराठवाडय़ाचा अधिकाधिक विकास घडवण्यासाठी त्यांचे योगदान मिळणे अपेक्षित आहे. तानाजी सावंत हे शिक्षणसम्राट, उद्योजक आहेत. एकनाथ शिंदे यांचे ते खंदे समर्थक आहेत. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या गटातील ते कार्यकर्ते. गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराजे देसाई प्रभृतींनी लोकांचे प्रश्न नेमकेपणाने सोडवण्यासाठी अभ्यास करायला हवा. शेतकऱयांच्या आत्महत्यांपासून पायाभूत सुविधांपर्यंत नाना प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, रायगडच्या पलीकडे महाराष्ट्र आहे, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. विकासाचे सगळे स्त्राsत याच भागात एकवटले आहेत. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही याच भागाला प्राधान्य देतात. त्यामुळे राज्याचा अन्य भाग अविकसित राहतो, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विजयकुमार देशमुख, राम सातपुते यांची नावे यादीत असतील, असे मानले जात होते. कदाचित दुसऱया टप्प्यात त्यांना स्थान मिळू शकेल. राज्य शकट हाकताना देवेंद्र फडणवीस यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण मंत्रीपद आणि सत्तेची लालूच असलेली शिंदे गटातील विविध पक्षांतून फिरून आलेली मंडळी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यांची ‘बॉडी लँग्वेज’ त्यांच्या भावी कार्यप्रणालीचा प्रत्यय देत आहे. अशा लोकांकडून काम करवून घेणे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नाही. प्रचंड वाढलेली महागाई आणि घटत चाललेले उत्पन्न यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे. कोरोनासह स्वाईन फ्ल्यू आणि अन्य साथरोगांमुळे आरोग्यपूर्ण जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. सगळय़ा क्षेत्रात वाढत असलेली गुन्हेगारी, लाचखोरी रोखणे हे आव्हान नवे सरकार कसे पेलते ते पाहणे औत्सुक्मयाचे ठरेल.

Related Stories

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन ?

Patil_p

अंमलबजावणीचे ओझे

Patil_p

यंदा हे नाहीच!

Patil_p

गोवा राज्यात अवतरणार शिमगोत्सवी राजवट!

Patil_p

मास्क वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

Patil_p

राजकारण्यांच्या उडय़ा तर दहशतवाद्यांच्या खोडय़ा!

Amit Kulkarni
error: Content is protected !!