Tarun Bharat

रशियातील चार्टर विमान अखेर सर्व पर्यटकांसह दाबोळीत दाखल

बॉम्बची खबर अखेर रशियातील अफवा ठरली

प्रतिनिधी /वास्को

बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या वृत्तामुळे सोमवारी रात्री गुजरातच्या जामनगर येथील विमानतळावर तातडीने उतरवण्यात आलेले रशियातील चार्टर विमान अखेर मंगळवारी दुपारी गोव्यात दाखल झाले. 236 प्रवासी आणि 8 कर्मचाऱयांसह हे विमान दुपारी पावणे तीनच्या सुमारास दाबोळीच्या धावपट्टीवर उतरले. या विमानात कोणतीही विस्फोटक वस्तू किंवा संशयास्पद असे काही आढळून आले नसल्याने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची ती खबर रशियातील अफवा असल्याचे सिध्द झाले आहे.

सोमवारी रात्री रशियातील मॉस्को येथून गोव्याकडे उड्डाण केलेल्या अझूर एअरलाईन्सच्या रशियन चार्टर विमानाला गोव्यात पाहोचण्यापूर्वीच गुजरातच्या जामनगर विमानतळावर तातडीने उतरवणे भाग पडले होते. विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची खबर रशियातील संबंधीत हवाई कंपनीला मिळाली होती. त्यामुळे विमान व प्रवाशाच्या सुरक्षेसाठी ही माहिती अधिकृतरीत्या दाबोळी विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाला सदर हवाई कंपनीने पुरवली होती. त्यानंतर दाबोळी विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. मात्र, हे विमान दाबोळी ऐवजी तातडीने गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरवण्यात आले.

जामनगर येथे विमानाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हे विमान सर्व प्रवासी आणि कर्मचाऱयांसह जामनगरहून गोव्याकडे येण्यासाठी निघाले. मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दाबोळीच्या धावपट्टीवर या विमानाचे आगमन झाले. त्यानंतर सर्व चार्टर पर्यटक रस्तामार्गे आपापल्या नियोजित स्थळी रवाना झाले.

या प्रवाशांना व कर्मचाऱयांना जामनगर येथील विमानतळावर तपासणीला सामोरे जावे लागले. हवाई जहाजाचीही तपासणी झाल्याने प्रवाशांची रात्र जामनगर विमानतळावरच गेली. या सुरक्षा तपासणीच्या कामात दिल्ली व अहमदाबाद येथील राष्ट्रीय सुरक्षा पथक सहभागी झाले होते. मात्र, जवळपास पंधरा तासांच्या तपासणीनंतर या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची रशियातून आलेली खबर केवळ अफवा होती असे उघड झाले.

Related Stories

विकासाबद्दल बोलणारा आप हा एकमेव पक्ष

Amit Kulkarni

शिवाजीराजे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

Amit Kulkarni

शेळपेतील ‘वरुण ब्रिव्हरेजिस’मध्ये कार्यरत कामगार स्थानिकच

Omkar B

काणकोण पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ

Omkar B

अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळण्याची गरज

Amit Kulkarni

मेळावलीत पोलिसांची महिलांवर मर्दुमकी

Omkar B