ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले, मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. अडीच वर्ष भ्रष्टाचार करण्यातच घालवली. देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करून रणनीती आखत होते. शेवटी त्यांनी स्वतःचे सरकार आणून दाखवले. आता आपल्याला कोणी न्याय देणारे असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं आहेत, अशी स्तुतीसुमने शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी फडणवीसांवर उधळली.
मेटे यांच्या जन्मदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
मेटे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे. पण आमच्या मनात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत. तुम्ही शब्द दिला होता सरकारमध्ये घेण्याचा तो जरी पाळला नाही तरी आम्ही तुमच्या सोबत असू. तुम्ही आम्हाला न्याय द्या, अन्याय द्या पण आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत. तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खरीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा.
हेही वाचा : 20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार?
शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही सत्ता चालवता. पण मागच्या अडीच वर्षात 5 मिनिटेसुद्धा शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील पुतळय़ाच्या आढावा बैठकीला वेळ दिला नाही, असा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला.