हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना काँग्रेसचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
विद्यमान सरकारने राज्याला दिवाळखोर केले आहे. त्यामुळे हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमदारांना प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देण्याऐवजी मुख्यमंत्री प्रमोद सावंताना खर्च कपात व लोकशाही मुल्यांचे जतन करण्यावर प्रशिक्षण घेण्याचा सल्ला द्यावा, असे काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
आमदारांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातील दोन दिवशीय शिबीर एका पंचतारांकीत हॉटेलात घेणे तसेच ते भाजप व संघाचा उदोउदो करणाऱया एका संस्थेमार्फत घेणे या प्रकारास काँग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सर्वप्रथम जाहीर विरोध केला. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात असे पणजीकर यांनी म्हटले आहे.
राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना एका पंचतारांकीत हॉटेलात लाखो रुपयांची उधळपट्टी करुन जेमतेम दहा आमदारांनी हजेरी लावलेले प्रशिक्षण शिबीर का घेतले यावर प्रश्न विचारणे आर्लेकर यांना जमले नाही. यापूर्वी तेही गोव्याचे सभापती होते व विधानसभा संकुलातील सर्व सोयीसुविधांची जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांची दुट्टपी भूमिका स्पष्ट होते, असा दावा पणजीकर यांनी केला आहे.
भाजप सरकार आज कोटय़वधी रुपयांचा चुराडा करुन केवळ उत्सव व कार्यक्रम आयोजित करुन पंतप्रधान मोदी प्रमाणेच स्वतःचा उदोउदो करण्यात मग्न आहे. राज्यात आज विविध सामाजिक योजनांचे लाभार्थी, सामान्य जनता, हलाखीच्या स्थितीत जगणारे खेळाडू, कोविड मृतांचे नातेवाईक, शेतकरी हे वर्षानुवर्षे सरकारच्या अर्थसाहाय्याची वाट पाहत आहेत. परंतु सरकारला जनतेचे काहीच पडलेले नाही अशी टिका अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.