अमेरिकेच्या प्रसारमाध्यमाचा दावा ः 132 जणांचा झाला होता मृत्यू
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
चीनच्या गुआंग्शीमध्ये मार्च महिन्यात झालेल्या विमान दुर्घटनेवरुन चकित करणारी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यम वॉल स्ट्रीट जर्नलने चायना ईस्टर्नचे विमान जाणूनबुजून पाडविण्यात आले होते असा दावा केला आहे. या कथित दुर्घटनेत विमानातील सर्व 123 प्रवाशांसह चालक दलाच्या 9 सदस्यांचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळावर हस्तगत फ्लाइट डाटा रिकॉर्डरला विश्लेषणासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले होते. विमानाच्या अवशेषांमधून हस्तगत करण्यात आलेल्या एका ब्लॅक बॉक्सच्या तपासणीतून कॉकपिटमध्ये घुसून कुणीतरी जाणूनबुजून विमानाचा अपघात घडविला असावा असे आढळून आले आहे. प्रारंभिक तपासात तांत्रिक बिघाडाचा कुठलाच संकेत न मिळाल्यानंतर वैमानिकांच्या कार्यांची तपासणी करण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
फ्लाइट एमयू 5735 ने 21 मार्च रोजी दुपारी 1.15 वाजता कुनमिंग चांगशुई विमानतळावरून उड्डाण केले होते. हे विमान दुपारी 3 वाजता गुआंगझोऊ येथे पोहोचणे अपेक्षित होते. परंतु विमान दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळेत 30 हजार फुटांच्या उंचीवरून खाली कोसळले होते. 563 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने पर्वतांना धडकून ते कोसळले होते. तत्पूर्वी विमानाचा एटीसीशी असलेला संपर्क तुटला होता.
अवशेषांमध्ये पहिल्यांदा मिळालेल्या ब्लॅकबॉसमधून कुठल्याही प्रकारच्या डाटाचा ऍक्सेस करता आलेला नाही. विमानात दोन ब्लॅक बॉक्स असतात. एक ब्लॅक बॉक्स कॉकपिटमधील संभाषण आणि अन्य आवाज रिकॉर्ड करतो. तर दुसरा ब्लॅक बॉक्स वेग, दिशा, उंची आणि वैमानिकांच्या निर्देशांना रिकॉर्ड करत असतो.