युक्रेनच्या सैन्याला मिळाले मोठे यश
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनला रशियाच्या विरोधातील युद्धात 6 महिन्यांनी मोठे यश हाती लागले आहे. युक्रेनच्या सैन्याने देशाच्या पूर्वोत्तर भागातील इजियूम शहरातून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावले आहे. युक्रेनचे सैन्य सातत्याने या भागात पुढे सरकत आहे. युद्धाला आता नवे वळण मिळाल्याचे तज्ञांचे मत आहे.
इजियूम शहराला आता मुक्त करविण्यात आल्याची घोषणा महापौर वालेरिय यांनी केली आहे. या शहरात आता आपत्कालीन सेवा कार्यरत झाल्या असल्याने युपेनियन लोक परतण्याची शक्यता आहे. पूर्ण खारकीव्ह भागात रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. रशियाचे सैनिक एका गावातून दुसऱया गावात पळ काढत आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने खारकीव्ह भागात स्वतःच्या चौक्यांच्या ठिकाणी पुन्हा सैन्य पाठवत असल्याचे शुक्रवारीच म्हटले हेते. तर रशियाने आता आपले सैन्य इजियूम शहरातून बाहेर पडल्याची पुष्टी दिली आहे. आमचे सैन्य एका योजनेच्या अंतर्गत मागे हटल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियाच्या सैन्याकडून पांढरे निशाण
इजियूम शहर रशियाच्या कब्जातून मुक्त होण्याची घटना युक्रेनच्या युद्धात ऐतिहासिक वळण ठरू शकते असे तज्ञांचे मानणे आहे. याची तुलना युक्रेनची राजधानी कीव्हनजीक पासून रशियाच्या सैन्याला रिकामी हाताने माघार घ्याव्या लागलेल्या घटनेशी करत आहेत. या भागात रशियाच्या सैन्याने एका रेल्वेस्थानकानजीक पांढरे निशाण दाखविले होते. तत्पूर्वी तेथे मोठा संघर्ष झाला होता असे युक्रेनच्या एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
युक्रेनच्या पूर्वोत्तर भागात जोरदार संघर्ष आहे. मागील काही दिवसांमध्ये रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आम्ही हळूहळू पुन्हा आमचा भूभाग परत मिळवत आहोत असे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत. खारकीव्ह भागातील कारवाईत 2500 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातून रशियाच्या सैन्याला पळ काढावा लागल्याचा दावा अमेरिकेच्या एका थिंकटँकने केला आहे.