कौशर आलमला तेलंगणातून अटक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांचे निकटवर्तीय कौशर आलम यांना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान कौशरच्या घरातून शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी बुधवारी तेलंगणातून त्यांना अटक केली. एसीबीने 17 सप्टेंबर रोजी आप आमदार खान यांना अटक केल्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. त्यांच्या चौकशीत कौशरचे नाव पुढे आले होते. पथकाने कौशरच्या घरावरही छापा टाकत तेथून 12 लाखांची रोकड, एक विनापरवाना पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली होती. याशिवाय एसीबीच्या पथकाला एक लाल रंगाची डायरी सापडली असून त्यामध्ये कोटय़वधींच्या व्यवहारनोंदी आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
अमानतुल्ला खान आणि कौशर आलम या दोघांमध्ये दीर्घकाळापासून घनि÷ संबंध आहेत. यासोबतच दोघांमधील व्यवहारही उघडकीस आला आहे. शनिवारी एसीबीच्या पथकाने अमानतुल्लाचा जवळचा सहकारी कौशर आलम सिद्दिकी याच्या घरावर छापा टाकला. यावेळी 12 लाखांची रोकड आणि एक विनापरवाना पिस्तूल, काडतुसे जप्त करण्यात आली. मात्र, कौशर आलम फरार होता. त्याचा शोध घेतल्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाच्या अनियमितते प्रकरणी एसीबीचे पथक अमानतुल्ला खान यांच्याविरोधात चौकशी करत आहे. त्याअंतर्गतच कौशर याला गजाआड करण्यात आले आहे.