सरकारने लक्ष द्यावे, डॉ. लोहिया – डॉ. मिनेझिस यांचे पुतळे उभारावेत : जागरूक नागरिकांची मागणी
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
असोळणा येथील लोहिया मैदान हे गोव्याच्या मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची साक्ष देणारे दक्षिणेतील एक महत्त्वपूर्ण असे स्थळ असून सरकारने या मैदानावर डॉ. राम मनोहर लोहिया व डॉ. ज्युलियांव मिनेझिस या थोर स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे एकत्र बसवून उभयतांचा मान राखावा, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. सध्या या मैदान परिसराची दुरवस्था झालेली असून त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वेळळी मतदारसंघातील असोळणा येथील लोहिया मैदानाला फार महत्त्व असून हा चौक पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा डॉ. राम मनोहर लोहिया मुंबईतून गोव्यात आले त्यावेळी आपले मुंबईतील परमस्नेही डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या असोळणा येथील निवासस्थानी उतरले होते. त्यावेळी दोघांमध्ये स्वातंत्र्यलढय़ाविषयी खलबते चालायची. लोहिया मैदान हे स्वातंत्र्यसंग्रामाचा जणू आखाडा बनले होते. या मैदानावर डॉ. लोहिया व डॉ. मिनेझिस यांच्या रात्रीच्या वेळी बैठका व्हायच्या. त्यावेळी देशप्रेमी नागरिक एकत्र जमायचे. त्यातून मुक्तीसंग्रामाला चालना मिळाली.
गोवा मुक्तीनंतर या मैदानाचे महत्त्व जाणून देशप्रेमी नागरिकांनी सतत मैदानाची शान राखली जावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालविले. स्वातंत्र्यसैनिक व अन्य जागरूक नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी 19 डिसेंबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अशा दिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम करायचे. मध्यंतरी असोळणा-वेळ्ळी परिसरातील स्वातंत्र्यसैनिक उर्सेलिन आल्मेदा, विश्वनाथ आरोलकर, इमेतेर पायस व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी वेळोवेळी मागणी लावून धरल्यामुळे भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी मैदानाचे सौंदर्यीकरण करून घेतले होते. त्यानंतर ध्वजारोहणासाठी चबुतऱयाची डागडुजी केली गेली व कार्यक्रम करण्यासाठी व्यासपीठाचे नव्याने पक्के बांधकाम करण्यात आले.
मात्र सध्या देखभालीविना मैदानाची दुरवस्था झाली असून बकाल स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाजीविक्रेते, मिळेल तशी पार्क केली जाणारी वाहने पाहायला मिळत असून हे चित्र पाहवत नाही. ही स्वातंत्र्यसैनिकांसाठी व एकूणच राज्यासाठी अवमानकारक गोष्ट आहे. या मैदानाकडे संबंधित सरकारी विभागांनी लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी स्वातंत्र्यसैनिक व अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक करत आहेत. असोळणा येथील लोहिया मैदान चौक पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून सरकारने या मैदानाच्या देखभालीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.