Tarun Bharat

संगतीचे परिणाम फार दूरगामी असतात

अध्याय सविसावा

 भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा, अध्यात्मात संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संगतीचे परिणाम फार दूरगामी असतात. चांगली संगत असेल तर त्याच्याप्रमाणे आपण वागावे असे वाटून साधकाची हमखास प्रगती होते परंतु दुर्जनाची संगत मात्र नक्कीच अडचणीत आणते कारण तो वागतोय तसे साधक वागत गेल्यास त्यांची अधोगतीच होते. हे अगदी निर्जीव गोष्टीतसुद्धा आढळून येते. उदाहरणार्थ एखाद्याच्या हातात काठी आली तर उगीचच कुणाला तरी मारावे असे वाटू लागेल. त्याउलट जर जपाची माळ हातात आली तर आपोआपच नामस्मरण करावे अशी इच्छा होईल. एकूण काय तर दुःसंगतीच्या सहवासाने नरकवास प्राप्त होतो. पश्चात्ताप झाला तरच त्यातून सुटका होते. त्यासंबंधाने मी तुला पुरुरवा आणि उर्वशीचा कथाप्रसंग सांगतो. ऐक, परम यशस्वी सम्राट पुरूरवा उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले. त्यामुळे अमुक एक हवे अशी कोणतीही इच्छा त्याला उरली नाही. हे सर्व कसे घडले विचारशील तर सविस्तर सांगतो. समुद्रवलयांकित पृथ्वीचे पालन करणारा, सर्व राजांचा मुकुटमणि, पुरूरवा नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. त्याची कीर्ति पुराणातून प्रसिद्ध आहे. तेज, प्रभाव, महाशौर्य, उचित दातृत्व, गांभीर्य, ख्याती, महती, पराक्रम आणि धार्मिक धैर्य इत्यादि गुणांनी पुरूरवा राजा युक्त होता. राजधर्माच्या नीतीनुसार स्वधर्माने तो पृथ्वीचे पालन करीत असे. सर्वांविषयी त्याच्या मनात अपार आनंद नांदत होता. गाईसाठी तर प्राणसुद्धा खर्ची घाली. दीनांचा तर केवळ पाठिराखा होता. पुरूरव्याला ‘ऐल’ असेही म्हणत कारण त्याच्या आईचे नाव इला असे होते. असा तो धार्मिक ऐल, चक्रवर्ती पुरुरवा राजा उर्वशीच्या नादी लागून, आपली प्रति÷ा विसरून गेला. नंतर त्याला त्याबद्दल पश्चाताप झाला आणि त्यातूनच त्याने पश्चात्तापपूर्वक जे गीत गाइले, त्याला ऐलगीत म्हणतात. पुरुरव्याची पूर्वीची कथा व कामासक्तता आधी ऐक. ही कथा वेदामध्येही सांगितलेली आहे. उर्वशी ही एक प्रसिद्ध अप्सरा होती. स्वर्गाला एक भूषण म्हणून नारायणानी तिला स्वर्गात आपण होऊन पाठवली पण तेथे आपणच काय ती श्रे÷, असे मानून ती गर्वाने फुगली. त्या गर्वाच्याच ऐटीमध्ये नृत्य करताना तालाचे पाऊल चुकले, त्यामुळे तिला ब्रह्मदेवानी शाप दिला की, तू मृत्युलोकी जाशील व मनुष्य तुझा उपभोग घेतील. तेव्हा तिने हात जोडून उःशाप मागितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की, तू  पुरूरव्याला निर्वस्त्र पाहिलेस की, पुन्हा स्वर्गात येशील. मिळालेल्या शापाचा परिणाम होऊन, उर्वशी मृत्युलोकी आली. तिच्या रूपाला पाहताच पुरूरवा राजा भुलून गेला आणि आपला थोरपणा विसरून त्या वेश्येला वश झाला. तो तिच्या रूपाने इतका वेडा झाला की, त्याला विचार करण्याचेही भान राहिले नाही. राजाला निर्वस्त्र स्थितीत पाहिले असता उर्वशी त्याला सोडून निघून जाईल, असा करार मान्य करून त्याने तिला आपल्या उपभोगार्थ आणली. तिने आपला शापाचा प्रभाव नाहीसा व्हावा म्हणून आपल्याबरोबर दोन मेंढे आणले होते. त्यांना मुलासारखे पाळले पाहिजे अशीही अट तिने राजाला घातली होती. राजाने तीही मान्य केली. ह्याप्रमाणे उर्वशीची गाठ पडताच राजाची कामेच्छा प्रबळ झाल्याने त्याने ती म्हणेल त्या अटी मान्य केल्या. तिच्या विलासात उजाडले केव्हा व रात्र झाली केव्हा, हेही त्यास कळेनासे झाले. असे किती तरी दिवस लोटले. उर्वशीच्या संगतीने विलास करताना तो स्वधर्मकर्म विसरून गेला. त्याचे नित्यनेम टळले व विलासभोगाचा अतिरेक होत चालला. उर्वशीला मिळालेला उःशाप खरा ठरावा आणि तिचा कर्मभोग संपुष्टात यावा म्हणून बोकडांच्या रूपाने उर्वशीबरोबर इंद्राने अश्विनीकुमार यांना पाठविले होते. उर्वशीला स्वर्गास न्यावी म्हणून चोरांनी ते दोन्ही मेंढे मध्यान्ह रात्री चोरून नेले. चोरून नेताना ते ‘ब्या ब्या’ करून ओरडू लागले. बोकडांचा आवाज ऐकून उर्वशी दुःखाने खडबडून उठली आणि राजाची निर्भत्सना करून त्यास म्हणाली की, ‘तू एक षंढ आहेस. फुकट पुरुषार्थाच्या गोष्टी मात्र सांगतोस, माझी लेकरे चोरांनी नेली, तुझ्या त्या काळय़ा तोंडाला आग लागो!’ असे म्हणून ती कपाळ पिटू लागली.

क्रमशः

Related Stories

सप्ताहाच्या अंतिम दिवशी बाजार तेजीत

Patil_p

ममतांचा बार उडणार का फुसका ठरणार?

Patil_p

परमवीरना चपराक!

Patil_p

वंचितांचा आवाज गेला

Patil_p

मुंबईत 24 तास पाणी अशक्य

Omkar B

संकल्पांचे कॅनव्हास…

Patil_p