बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या सहापदरीकरण कामाला युद्धपातळीवर प्रारंभ
बेळगाव : बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या सहापदरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. सध्या बेळगावकडून निलजीपर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आता बळ्ळारी नाल्यावरही नव्याने पुलाची उभारणी करण्यात येणार असून त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव-बागलकोट रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. आता या कामाला गती आली असून अनेक ठिकाणी रस्ता खोदाई करून त्यावर भरती टाकण्यात येत आहे. याचबरोबर आता दोन्ही बाजूची झाडे पूर्णपणे काढण्यात आली आहेत. गांधीनगर, बसवनकुडची, शिंदोळी माळ तसेच निलजीपर्यंतच्या कामाला गती देण्यात आली आहे. बळ्ळारी नाल्यावर आणखी एका पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे सहापदरीकरण होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही इमारतीही काढाव्या लागणार आहेत. एकूण या कामाला आता जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.