चिनी सैन्याच्या घुसखोरीला तैवानने चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ तैपेई
चीन आणि तैवान यांच्यातील संघर्ष पुन्हा निदर्शनास येत आहे. तैवानला रोखण्यासाठी चीनने समुद्रहद्दीत घुसखोरी केल्याचा दावा केला जात आहे. चीनच्या वाढत्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर तैवाननेही कठोर शब्दात चीनला फटकारले आहे. स्वत:च्या संरक्षणासाठी आमचा देश एकजुटीने लढणार असल्याचे स्पष्टीकरण तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिले आहे.
चीन तैवानवर कब्जा करण्याच्या प्रक्रियेत गुंतला आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साय इंग वेन यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीन सरकारने तैवानला वेढा घालण्यास सुऊवात केली आहे. चीनच्या नौदल आणि हवाई दलाने समुद्रात वसलेल्या तैवानच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यापैकी एक-दोन नव्हे तर 71 लढाऊ विमाने आणि 9 युद्धनौका तैवानच्या आसपास निदर्शनास येत आहेत. युद्धाभ्यासाचे निमित्त चीनकडून पुढे करण्यात आले असले तरी यामागे चीनचा व्रूर डाव उघड झाला आहे. याचदरम्यान, तैवानही स्वत:चे संरक्षण करण्यात गुंतले आहे. तैवानचे सैन्य अमेरिकेकडून खरेदी केलेली शस्त्रे, रडार आणि इतर लष्करी संसाधनांचा अवलंब करत आहे. अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
सर्व शक्ती पणाला लावणार!
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने कडक पवित्रा घेत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी एकजुटीने लढा देण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसात देशाला वेढा घालणारी अनेक चिनी विमाने सापडली आहेत. चिनी सैन्य आमच्या हवाई हद्दीत घुसले होते. त्यामुळे आम्हीही स्पर्धेत उतरण्यास सज्ज होत आहोत, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘तैवान ही आमची मातृभूमी आहे. आमची मातृभूमी नेहमीच एक मोहक आणि सुंदर देश आहे. या भूमीवरील प्रत्येक प्रसंग आमच्या आठवणींमध्ये कोरलेला आहे. आम्ही आमच्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून लढू’, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर म्हटले आहे.