जवळपास 20 कोटी युजर्सच्या डाटाचा समावेश ः इस्रायली तज्ञांचा दावा
वॉशिंग्टन
ट्विटरवर हॅकर्सनी 20 कोटींहून अधिकच्या युजर्सचे ईमेल पत्ते चोरले आहेत आणि ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले असल्याची माहिती आहे. इस्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक एलॉन गल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 24 डिसेंबर रोजी एका सुरक्षा संशोधकाने ते सोशल मीडियावर शेअर केले. आता त्याचे क्रीनशॉट्स इंटरनेटवर व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. ट्विटरने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही अहवालांनी असाही अंदाज लावला आहे की हॅकिंग 2021 च्या सुरुवातीला घडले होते, ज्यावेळी एलॉन मस्ककडे कंपनीची मालकी नव्हती. ट्विटर हॅकिंगशी संबंधित ही पहिली घटना नाही. याआधीही अनेक बडय़ा राजकीय नेत्यांची आणि उद्योगपतींची खाती हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
1. तांत्रिक त्रुटीचा लाभ
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी सोशल मीडिया खाती आहेत. युजर्स या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर लोकांशी सामाजिक आणि व्यावसायिकरित्या जोडण्यासाठी करतात. या दोन चुकांमुळे हॅकर्स खाते हॅक करू शकतात. प्रथम, सोशल मीडिया ऍप्लिकेशनमध्ये काही त्रुटी असल्यास, हॅकर्स या तांत्रिक त्रुटींचा फायदा घेतात.
2.असा सापळा रचला जातो
हॅकर्स लोकांचे आयडी अनेक प्रकारे हॅक करू शकतात. हॅकर्स कॉल किंवा मेसेज पाठवून तुमच्यासोबत फिशिंग लिंक शेअर करू शकतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेसबुक, ट्विटर सारख्या दिसणाऱया साइटवर जाऊ शकता. यावर ते लॉगिन करण्यास सांगतील. बनावट खाती वापरून लॉग इन केल्यास हॅकर्स खात्याचा आयडी आणि पासवर्ड चोरू शकतात.