ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री 21 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार असून, कामाख्या देवीच्या मंदिरात ते विशेष पूजा करणार आहेत. यावेळी त्यांचे सर्व समर्थक आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सत्तांतरानंतर मुख्यमंत्री आपल्या 50 आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर जात आहेत. 21 नोव्हेंबरला त्यांचा एकदिवशीय दौरा आहे. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जी विशेष पूजा केली होती, ती पूजा ते पुन्हा करणार आहेत. या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आसामचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना ते भेटणार आहेत.
अधिक वाचा : कार्तिकी यात्रेसाठी अलकांपुरी गजबजली
कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांना इच्छित फळ देतो असं मानलं जातं. कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. तेव्हाही ते आपल्या आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा विजय व्हावा यासाठी शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याचे सांगण्यात येते.