कागल तालुक्यातील बामणी येथे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडील निवृत्त कर्मचाऱ्याच्या सुनेने दोन वेळा सरपंचपद भूषवलेल्या आमदार हसन मुश्रीफ गटाच्या विद्यमान सरपंच पत्नीचा पराभव करून धक्का दिला.
येथील पांडुरंग मगदूम हे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाकडे अठरा वर्षे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. रेश्मा यशवंत मगदूम या त्यांच्या सूनबाई प्रभाग क्रमांक एकमधून रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात विद्यमान सरपंच व दोनवेळा सरपंचपद भूषविलेले रावसाहेब पाटील यांच्या पत्नी कमल पाटील या रिंगणात होत्या. या प्रभागात मगदूम यांनी सौ पाटील यांना १८६ मतांनी धूळ चारली. याशिवाय बामणी गावांमध्ये वेल्डिंग व्यवसाय असलेल्या संतोष कुंभार या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांने पोलीस पाटील महादेव कुंभार यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच गीता कुंभार यांचा ३६१ मतांनी दारुण पराभव केला. येथे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संगीता मगदूम यांचे पती बाबुराव मगदूम यांनाही पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील भिवाजी रेंदाळे या तरुणाने मगदूम यांना धूळ चारली.