रिया पाटील हिला भारत कर्तव्यम् नृत्य पुरस्कार : काका परशराम यांच्यासह कुटुंबीयांचे प्रोत्साहन


वार्ताहर /किणये
मच्छे गावची कन्या रिया पाटील हिने कोल्हापूर, गोवा व बेळगाव या ठिकाणी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. मराठी वेब सिरीज व शॉर्ट फिल्ममध्येही तिने कला सादर केली आहे. त्यामुळे मच्छे गावची ही कन्या नृत्यकला क्षेत्रात झळकताना दिसत आहे.
शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन, मुंबई यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलन, बेळगाव 2022 या कार्यक्रमात रिया रामनिंग पाटील हिला ‘भारत कर्तव्यम नृत्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
लोकमान्य रंगमंदिरात पुरस्कार देऊन गौरव
लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे दि. 16 रोजी हा कार्यक्रम झाला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, लेखक, निर्माते संदीप राक्षे, अशोक दाभोळकर, दीपक बोडरे, जादुगार प्रेम आनंद, शामरंजनच्या अध्यक्षा स्वाती पवार, विद्यार्थी विकास अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात, कृष्णा बामणे आदींच्या हस्ते पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला.
रिया पाटील हिने मराठी जुगलबंदी या वेब सिरीजमध्ये नायिकेची भूमिका केली आहे. तसेच ‘गर्ल प्रेंड नसताना’ हा कव्हर अल्बम केला. रक्षाबंधन या शॉर्ट फिल्ममध्ये तसेच गडरक्षक या लघुपटात काम केले आहे.
मुंबईत रियाला नृत्य करण्याची संधी
एनडीए स्टुडिओ मुंबई येथे एका कार्यक्रमात रियाला नृत्य सादर करण्याची संधी गेल्या तीन महिन्यांपूर्वी मिळाली. चित्रकार योगी बिरादार यांच्या प्रयत्नामुळे रिया मुंबईच्या या स्टुडिओत नृत्य सादर करू शकली.
अभिनेत्री मानसी नाईक यांच्याकडून रियाचे कौतुक
अभिनेत्री मानसी नाईक यांनीही रियाचे कौतुक करून सराव कसा करावा, याबाबतची माहिती दिली. रियाचे काका कै. परशराम पाटील यांची इच्छा होती की रियाने मराठी चित्रपटात काम करावे. त्यानुसार त्यांनी तिला लावणी करण्यासाठी प्रोत्साहित केले. दोन वर्षांपूर्वी तिच्या काकांचे निधन झाले. सध्या तिला वडील रामनिंग पाटील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन मिळत आहे.
रिया सध्या बीकॉम द्वितीय वर्षात जैन कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेऊ लागली आहे. एम. कुमार, किरण पवार, सुनील नाझरे, राहुल लोहार आदींनी तिला नृत्याचे धडे दिले आहेत.