प्रतिनिधी/ बेळगाव
माळमारुती येथील महापालिका मालकीच्या भूखंडांची विक्री करण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ई-लिलावांतर्गत भूखंडांची विक्री होणार असून या प्रक्रियेत भाग घेण्याची मुदत सोमवारी संपली. दि. 25 रोजी याकरिता बोली लागणार आहे. या लिलाव प्रक्रियेत अनेकांनी सहभाग घेतला असल्याचे सांगण्यात आले.
माळमारुती परिसरातील जागेचे भू-संपादन करून महापालिकेने रहिवासी वसाहत निर्माण केली होती. या वसाहतीमधील काही भूखंड शिल्लक होते. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने तसेच न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. तसेच सध्या महापालिकेला शासनाकडून निधी मिळत नसल्याने विकासकामे राबविण्यास अडचण भासत आहे. त्यामुळे माळमारुती येथील 37 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली असून देण्यात आलेली मुदतही संपुष्टात आली आहे. दि. 25 रोजी बोली लागणार असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.